शेखर वैद्य (Chandrashekhar Vaidya)

तीर्थरूप दादास

नाशिक,

दि. १० ऑक्टोबर २०२०

तीर्थरूप दादास,

प्रथम तुम्हास साष्टांग प्रणाम, मला माहितेय मी लिहीत असलेलं हे पत्र जगातलं कोणतंच पोस्ट ऑफिस तुमच्या पर्यत पोहोचविण्यास समर्थ नाहीये तरीही आज मनातल्या भावनांना शब्दरूपात व्यक्त करुन त्यांना वाट मोकळी देण्याचा प्रयत्न करतोय.

दादा, मंगळवार २२ जुलै १९८६ या दिवसाची सकाळ रोजच्या प्रमाणे उगवली खरी परंतु सायंकाळ होता होता आयुष्यभरासाठी आम्हा सर्वांना एक गहिरा आघात देऊन गेली. जुलै महिना आकाश काळ्या ढगांनी गच्च भरलेलं, सहा साडेसहा झालेले, तुमच्या सुनबाई आई आणि तुम्ही सोडले तर आम्ही दोघे भाऊ अजुनही अंथरुणात अर्धवट निद्राधीन. तुम्ही नेहमीप्रमाणे ब्रश करुन आईला चहा ठेवायला सांगून, आत्ता येतो!म्हणुन घरापासून थोडं दूरवरच्या सार्वजनिक ठिकाणी प्रातःर्विधी साठी गेलेला. मात्र थोडा वेळ जातो न जातो तोचं धांवत येऊन कुणीतरी जोरजोरात दार वाजवित. बाबा पडले! बाबा पडले! असा घाबरलेल्या स्वरातील आवाज कानावर येतो. ते शब्द तो आवाज कानावर पडतांच आम्ही खडबडून जागे होऊन त्या जागेकडे धावायला लागतो, तोपर्यंत पावसामुळं निसरड्या जागेवरून पाय घसरून पडले बिडले असावेत हेचं मनांत आलेलं. परंतु तिथंवर पोहोचेपर्यत सगळं संपलेलं….. दादा,पाहतो तर आजूबाजूच्या रहिवाश्यांनी तुम्हाला उचलून एका जागेवर झोपवलेलं. आम्ही आवाज देतोय दादा! दादा! तुमच्या कडून काहींचं प्रतिसाद नाही. आमच्या पैकी एक जवळच्या फॅमिली डॉक्टरांना बोलावण्यासाठी तिकडं धाव घेतो, जमलेल्या कांही जणांच्या मदतीनं तुम्हाला उचलून घरात घेऊन येतो. या सगळ्या धावपळीची काहींचं कल्पना नसलेली आई चहात दूध टाकून तुम्ही आल्यावर रोजच्या प्रमाणे सोबतच चहा घेऊ म्हणुन तुमच्या येण्याची वाट पाहात तशींच थांबलेली.. डॉक्टर येतात.. तपासतात.. ‘हार्टफेल’ शब्द कानावर आदळतात.. हे सगळं पाहणारी ऐकणारी आई थिजल्या सारखी एकाजागी स्तब्ध उभी.. आमचा बांध फुटतो.. नियतीच्या कांही मिनिटांच्या खेळीत विजय तिचा झालेला असतो आणि आम्ही क्षणभरात पितृछत्र हरपलेले असहाय्यपणे हतबल उभे….

दादा, या घटनेला जवळजवळ चौतीस पस्तीस वर्ष झालीत पण आजही तो प्रसंग डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो.. खेद खंत वाईट एकाचं गोष्टीचं वाटतं. दोन दोन मुलं हाकेच्या अंतरावर असूनही तुमच्या अंतसमयी आम्ही तुमच्या जवळ नव्हतो…नाही माहित मला, आज आता तुम्ही कुठे आहात, कसे असाल? देवलोक स्वर्गलोक पुनर्जन्म वैगरे ह्या संकल्पना जरी खऱ्या असतील/नसतील याची कल्पना नाहीये मला परंतु जिथं असाल तिथं सुखी समाधानी राहावेत म्हणुन मी/आम्ही हिचं एक प्रार्थना करून आता…. पत्राला पुर्ण विराम देतो.

तुमचा पुत्र

शेखर वैद्य.

— शेखर वैद्य

Chandrashekhar Vaidya

लेखाची लिंक : https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/4117054288310955/

प्रोफाईल लिंक : https://www.facebook.com/chandrashekhar.vaidya.940?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*