श्रद्धेच्या शक्तीमुळे व्यक्ती निर्भय बनते

एक जोडपे भारतभ्रमण करण्यासाठी निघाले होते. अनेक स्थळं पाहात पाहात समुद्र पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी ते समुद्र किनार्‍यावर आले. ज्या नौकेतून ते समुद्राचा फेरफटका मारणार होते त्या नौकेत ते बसले. नौका समुद्रावर विहार करू लागली. सर्व प्रवासी लाटांचा, त्यातील तुषारांचा आनंद घेत होते. इतक्यात समुद्रात वादळ उठले. लाटा जोरजोरात येऊ लागल्या आणि नौका हेलकावे खाऊ लागली. कोणालाही जीवाची शाश्वती वाटेना. त्या जोडप्यातील स्त्री अतिशय घाबरली. पण पती मात्र शांत आणि स्थिर होता. त्याचा शांतपणा बघून तिने आपल्या पतीला विचारले, ”अहो, तुम्ही इतके शांत कसे ? भीती वाटत नाही का ? काहीतरी धडपड करा आणि आपले जीव वाचवा.” अस्वस्थपणे ती सारखं सारखं आपल्या पतीला हे सांगत होती, शेवटी पतीने समोरच्या टेबलवरील चाकू उचलला, तिच्या गळ्याला लावला आणि विचारले, ”आता तुला माझी भीती वाटते ?” त्यावर ती ‘नाही’ म्हणाली. त्याने कारण विचारताच ती म्हणाली, ”तुमच्या हाती माझं सर्व आयुष्य असतांना तुमची भीती कशी वाटेल ?” त्यावर तो म्हणाला, ”हो ना ? हे सगळं जीवनच ईश्वराने दिलं आहे तर मग भीती कशाची बाळगायची ?”
तात्पर्य – श्रद्धेच्या शक्तीमुळे व्यक्ती निर्भय बनते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.