रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर प्रथम मनातील जाळी जळमटं काढून मन स्वच्छ करून रात्रीला आणि दिवसाला सुरुवात करावी

देवदत्त अतिशय अस्वस्थ झाला होता. मानसिक ताणाबरोबर त्याची प्रकृतीही बिघडायला लागली होती. गावात एक सिद्ध साधू महाराज होते. देवदत्त त्यांच्याकडे गेला; आणि आपली व्यथा सांगू लागला, ”महाराज, अति विचार करून मी त्रासून गेलो आहे. या विचारांमुळे रात्र रात्र झोप येत नाही. त्यामुळे अस्वस्थपणा फारच वाढतो. आता तर प्रकृतीवरही परिणाम होऊ लागला आहे. यावर काहीतरी उपाय सांगा.” त्या साधू महाराजांनी देवदत्ताला आपल्या एका स्नेह्याकडे पाठविले आणि त्यांच्याकडे चार-पाच दिवस त्यांची दिनचर्या पाहून येण्यास सांगितले. देवदत्त गुरुंची आज्ञा मानून त्यांच्या स्नेह्यांच्याकडे राहून त्यांची सर्व दिनचर्या पाहून परत आला. तरीही या सर्व गोष्टींचा त्याला काहीच उलगडा झाला नाही. ”तुम्ही तिथे काय पाहिले ?” या साधू महाराजांच्या प्रश्नावर देवदत्त म्हणाला, ”अभ्यासण्यासारखी तुमच्या स्नेह्यांची दिनचर्या नाही. ते रात्री सर्व भांडी धुतात आणि रात्रभरात त्याच भांड्यांवर थोडीशी धूळ बसली असेल म्हणून सकाळी पुन्हा ती सर्व भांडी धुऊन काढतात.” मी जरा आश्चर्यानेच त्यांना या प्रकाराबद्दल विचारले तेव्हा त्यांनी उत्तर दिले, ”मी या मंगल कार्यालयाची व्यवस्था बघतो. धुळीने भरलेली भांडी किवा कार्यातील अस्वच्छता मला आवडत नाही. धुळीने भरलेली भांडी स्वच्छ करून ठेवणे माझे कर्तव्य आहे. म्हणून ती मी सकाळ संध्याकाळ स्वच्छ करतो.” हे ऐकल्यावर साधू महाराज म्हणाले, ”देवदत्ता, जे पहायला हवं, समजून घ्यायला हवं ते तू समजून नाही घेतलंस. अरे, चित्त निर्मल तर सुखच सुख.
तात्पर्य – रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर प्रथम मनातील जाळी जळमटं काढून मन स्वच्छ करून रात्रीला आणि दिवसाला सुरुवात करावी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.