सुखाच्या किवा दु:खाच्या काळात स्थितप्रज्ञ दृष्टिने आपणच आपल्या आयुष्याकडे पहायला हवं

एका गावात दीनानाथ नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्या श्रीमंतीचा सर्व गावाला हेवा वाटत असे. एकदा एका व्यवहारात दीनानाथाला खूप नुकसान आले. त्याची सर्व संपत्ती तर गेलीच पण तो कर्जबाजारी सुद्धा झाला. हे सगळं सहन न होऊन त्याने आत्महत्या करायचे ठरवले. नदीला भरपूर पूर आला होता. मध्यरात्रीची वेळ सगळीकडे अंधार होता. दीनानाथ त्या पूलाच्या कठड्यावर चढला. तो नदीत उडी मारणार एवढ्यात त्याचा हात कोणीतरी धरला. विजेच्या उजेडात त्याचा हात धरणारा साधू त्याला दिसला. त्याने त्या साधूजवळ खूप विनवण्या केल्या. तेव्हा साधूने विचारले की, ”तू का आत्महत्या करतो आहेस ? त्यावर दीनानाथ म्हणाला, ”महाराज, मी पूर्वी खूप सुखी होतो, श्रीमंत होतो पण आता माझं सर्वस्व गेलं आहे त्यामुळे मी आयुष्याला कंटाळलो आहे.” त्यावर साधूने विचारले, ”तू पूर्वी खूप सुखी होतास हे नक्की खरं आहे का ?” त्यावर दीनानाथाने ‘हो’ म्हणून मान हलवली. मग तो साधू म्हणाला, ”तर मग हे ही खरं आहे की, तुझे सुखाचे दिवस जसे गेले तसे हे दु:खाचेही दिवस जातील. हे तर नियतीचे चक्रच आहे. ह्या गोष्टी तुझ्या-माझ्या हातातल्या नाहीत.”
तात्पर्य – सुखाच्या किवा दु:खाच्या काळात स्थितप्रज्ञ दृष्टिने आपणच आपल्या आयुष्याकडे पहायला हवं.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.