सामर्थ्य असलं तरी सहनशीलता असणं आवश्यक असतं

पंढरपूरच्या एका फार मोठ्या संताची ही कथा. संतच ते. त्यामुळे स्वभावाने अतिशय शांत, उदार आणि सहनशील. म्हणून त्यांची ख्याती होती. ”पण संत झाला तरी शेवटी तो माणूसच असतो. त्यामुळे त्यालाही कधी ना कधी राग येणारच. आणि तो मी नक्कीच आणून दाखविन” असे म्हणत देवरामने आपल्या मित्रांशी पैज लावली. वृत्तीने संत असलेल्या त्या व्यक्तीला स्वत:चा संसार होताच. त्यासाठी वस्त्र विणण्याचा आणि ते बाजारात नेऊन विकण्याचा त्यांचा व्यवसाय होता. एक दिवस अतिशय सुंदर वस्त्र विणून ते त्यांनी बाजारात विकण्यासाठी आणले. आज या संत महात्म्याला राग आणून दाखवायचा म्हणून पैज जिकण्याच्या उद्देशाने देवराम तेथे पोहोचला. ”हे वस्त्र केवढ्याचे ?” त्याने विचारले. ”हजार नाणी” संताने उत्तर दिले. ते वस्त्र मधोमध फाडून देवरामने त्याचे चार तुकडे केले. ”आता याची किती किमत ?” ”प्रत्येक तुकड्यासाठी अडीचशे नाणी.” त्यानंतर देवरामने त्या वस्त्राचे लहान लहान तुकडे केले. ”आता हे किती नाण्याला देणार ?” असे देवरामने विचारताच ते संत म्हणाले, ”आता याचं काहीच मूल्य नाही कारण याचा कुणालाही उपयोग नाही. त्यामुळे ते कुणीही विकत घेणार नाही.” मनाचा कुठलाही तोल न बिघडता त्यांनी अतिशय शांतपणे उत्तर दिले. देवरामला त्यांच्यातील संतत्वाची प्रचिती आली. त्याने त्यांना नमस्कार करून माफी मागितली आणि त्या वस्त्रासाठी हजार नाणीही त्यांना दिली.
तात्पर्य – सामर्थ्य असलं तरी सहनशीलता असणं आवश्यक असतं.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.