सांगण्याची पद्धत

आजकालच्या सारखे पूर्वी दूरदर्शन, सिनेमा किंवा रेडिओ नव्हते. त्याकाळी मनोरंजनाची साधनं कमी होती त्यामुळे डोंबारी, मदारी, दरवेशी, गारूडी ह्यांचे खेळ सतत रस्तोरस्ती होत असत. सामान्य माणसांना तिच करमणूक असल्यामुळे लोकं ते खेळ आवडीने बघत असत. आणि त्याबदल्यात आणा, दोन आणे त्या खेळ करणाऱ्या मदार्‍याच्या झोळीत टाकत असत. असाच एक खेळ करणारा मदारी रस्तोरस्ती, गावोगावी फिरून माकडांचे खेळ दाखवून आपले पोट भरीत असे. खेळ करण्यासाठी जवळ बाळगलेल्या माकडांना त्यानी अतिशय सुरेख वळण लावले होते. आणि विविध खेळ त्याने माकडांना शिकविले होते. लोकं मागणी करीत तसा तो खेळ माकडांना दाखवायला सांगत असे. मग तो सांगेल तसा खेळ ती माकडे करीत असत. त्या खेळाने लोकं खूश झाली की त्यातून त्याला चांगले उत्पन्नही मिळत असे, एक वर्ष मात्र त्या भागात खूप दुष्काळ पडला. मदार्‍याला कमाई होईना, स्वतःचे आणि माकडांचे पोट भरण अशक्य होऊ लागलं. उपाशी राहाण्यापेक्षा त्यांना जंगलात सोडून द्यावं असाही त्याने विचार केला. पण त्याचे सर्व कुटुंब त्यावरच अवलंबून होतं त्यामुळे कधी कधी तर तो स्वतः उपाशी राहून माकडाना खायला घालत असे. पण आता तेही कठीण वाटू लागले. शेवटी त्याने सर्व माकडांना बोलावले व सांगितले, ‘ ‘मी तुम्हाला सकाळी दोन पोळ्या व संध्याकाळी तीन पोळ्या देऊ शकेन. हे ऐकल्यावर माकडं आरडा ओरडा करू लागली. त्यावर मदार्‍याला कल्पना सुचली आणि तो म्हणाला, ‘ ‘ठीक आहे. मी सकाळी तीन पोळ्या देईन व संध्याकाळी दोन पोळ्या देईनं’ ‘ मालक आपल्याला काही तरी जास्त देतो आहे असे वाटून, माकडं शांत झाली आणि त्यांचा गोंधळ थांबला.

तात्पर्य : गोष्ट तीच, पण ती तुम्ही कशी सांगता यावर यश अपयश असतं.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.