संसाराची आसक्ती सुटायलाही काही काळ जावाच लागतो

सुरत शहरात एक अतिशय मोठा कापडाचा प्रसिद्ध व्यापारी होता. आयुष्यभर कष्ट करून त्याने बरीच माया जमवलेली होती. त्याची मुलंही आता त्याचा व्यवसाय बघू लागली होती. सर्व सुखं त्यांच्यापुढे हात जोडून उभी होती. त्यामुळे तृप्त मनाने त्याला आता ईश्वराचे दर्शन व्हावे असे वाटत होते. त्याने कुठेतरी वाचले होते की, सर्वस्वाचा त्याग करणार्‍याला ईश्वर दर्शन देतो. म्हणून ईश्वर दर्शनाच्या ओढीमुळे त्याने आपली सर्व संपत्ती बायको-मुलाबाळांच्या नावावर करून दिली. परंतु तरीही त्याला ईश्वराचे दर्शन होत नव्हते. शेवटी तो योगीराज स्वामींना भेटला. आपली अडचण त्याने स्वामींना सांगितली. त्यावर स्वामी त्याला म्हणाले, ”फक्त सर्व संपत्तीचे दान केल्याने ईश्वराचे दर्शन होत नाही. तेलाच्या डब्यातील तेल संपूर्ण ओतून टाकलं तरी भांड्याला बरंच तेल चिकटून राहातं. तसंच ते भांड घासून स्वच्छ केलं तरी त्याला तेलाचा वास हा राहातोच. त्यामुळे या तेलाप्रमाणेच तुम्ही संपत्ती जरी देऊन टाकली असली तरी संसाराविषयी असलेली आसक्ती मात्र एका मिनिटात पुसता येत नाही. ती जाण्यासाठी काही काळ हा व्यतित करावा लागतो. मगच ईश्वराचे दर्शन शक्य आहे.”
तात्पर्य – संसाराची आसक्ती सुटायलाही काही काळ जावाच लागतो.

1 Comment on संसाराची आसक्ती सुटायलाही काही काळ जावाच लागतो

Leave a Reply

Your email address will not be published.