संकटाच्या वेळेस व्यवहार ज्ञानाचं महत्त्वाचं

एका जंगलात एक जुनाट पडका वाडा होता. सध्या तिथे कोणत्याच मानव प्राण्याची वस्ती नसल्यामुळे तो वाडा ओसाड झाला होता. आजूबाजूला दाट झाडी वाढली होती. घराकडे कोणी फिरकत नसल्यामुळे अनेक जंगली प्राणी, पशू, पक्षी यांचा मुक्काम त्या वाड्यात असे. एक दिवस त्या वाड्याला आग लागली. जंगलातील आदिवासी लोक त्या वाड्याकडे धावले ‘वाडा पेटला आहे बाहेर पडा’ असं ओरडून ते त्या प्राण्यांना सावध करू लागले. आवाज ऐकून कासव बाहेर आले म्हणाले,‘‘कशाला ओरडता आगीतून बाहेर पडायचे पाचशे उपाय माझ्याजवळ आहेत.’’ त्याच्यानंतर साप बाहेर आला आणि म्हणाला, ‘‘माझ्याजवळ शंभर उपाय यातून बाहेर पडायचे आहेत तेव्हा घाबरता कशाला ?’’ इतका वेळा बाजूला उभं राहून एक धूर्त कोल्हा हे सगळं बघत होता. आदिवासींनी त्याला विचारले, ‘‘तुला आगीची भीती वाटत नाही का ? की तुझ्याजवळ काही उपाय आहे ? त्यावर कोल्हा म्हणाला, ‘‘हो माझ्याजवळही उपाय आहे जो मला आईने सांगितला आहे. आग लागताच पळ काढायचा आणि सुरक्षित ठिकाणी जाऊन राहायचे.’’ एवढं बोलून तो त्वरेने वाड्याबाहेर पडला आणि जंगलात पळून गेला. कासव मात्र इतर प्राण्यांना आगीतून सुटका करून घ्यायचे उपाय सांगत बसला. तेवढ्यात त्याच्या पाठीवर जळणारं लाकूड पडलं आणि त्याखाली जळून ते गतप्राण झालं. कोल्हा मात्र हुशार ठरला. त्याने प्रसंगावधान राखून स्वतःचे प्राण वाचवले.
तात्पर्य – संकटाच्या वेळेस व्यवहार ज्ञानाचं महत्त्वाचं.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.