विन्स्टन इंग्लंडमध्ये सहजी परतले. परंतु त्यांचे राजकारणातील पुनरागमन इतके सोपे जाणार नव्हते. राजकारणात परतायचे तर दार्दानेल्सच्या शोकांतिकेत त्यांचा वाटा मोठा नाही, हे सर्वांना समजणे आवश्यक होते. विन्स्टन यांनी म्हणूनच परतल्या परतल्या पंतप्रधान अॅस्क्विथ यांच्याकडे, दार्दानेल्स मोहिमेचे त्यांनी प्रथम तयार केलेले टाचण प्रसिद्ध करण्याची परवानगी मागितली. युद्धकाळात अशा तर्हेचे कागद प्रसिद्ध करणे शक्य नाही, हे कारण सांगून पंतप्रधानांनी त्या ऐवजी या मोहिमेची चौकशी करण्यासाठी एक ‘कमिशन’ जाहीर केले. चौकशी कमिशनचा निर्णय बाहेर यायला बराच कालावधी लागणार होता.
-वि. ग. कानिटकर (विन्स्टन चर्चिल)