हुशारीची किंमत

खेड्यात दोघं मित्र राहात होते. दिनेश आणि मंगेश. दिनेश तसा बुद्धीने हुशार परंतु घरची परिस्थिती अगदी गरीबीची म्हणून त्याचे शिक्षण सुटले होते. तर मंगेशला शिक्षणात फारशी गतीच नव्हती म्हणून त्याचे शिक्षण थांबले होते. दोघेही बेकार होते. कामधंदा पाहण्यासाठी दोघेही शहरात आले.

एका कंपनीत दोघांनी इंटरव्हु दिला. मालकानी मंगेशला गोदामात पॅकिंगची खोकी उचलण्याचे काम दिले आणि दिनेशला कार्यालयात हिशोब पाहायचे काम दिले. महिना पूर्ण झाला. मालकानी मंगेशला २०० रु. पगार दिला व दिनेशला ४०० रु. पगार दिला. हे पाहून मंगेशला वाईट वाटले.

दुसऱ्या दिवशी मालक गोदामात आला असता त्याने मालकास याचे कारण विचारले. त्यावर मालक म्हणाला, “रस्त्यावर समोर एक ट्रक उभा आहे. त्यात काय आहे ते विचारून ये.”

मंगेश ट्रकवाल्याकडे गेला. मालकाकडे परत येऊन म्हणाला, “त्यात गहू
आहेत.”

मालकानी विचारलं, “तो कुठे चालला आहे?”

मंगेश पुन्हा धावत गेला आणि विचारून आला, “ट्रक मुंबईला चालला आहे.”

मालकांनी विचारलं, “तो कुठून आला आहे?“

मंगेश पुन्हा विचारायला धावत गेला. तो विचारून आला तेव्हढ्यात दिनेश तेथे आला.

मालक दिनेशला म्हणाले, “अरे बाहेर एक ट्रक उभा आहे त्यात काय आहे पाहून ये!”

दिनेश बाहेर गेला आणि परत आल्यावर मालकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याने एकाच खेपेत दिली. एकाच वेळी तो सर्व माहिती गोळा करून आला होता.

तेव्हा मालक मंगेशला म्हणाले, “तुमच्या दोघांतला फरक लक्षात आला का?” तोच फरक तुमच्या पगारात आहे.

तात्पर्य : काम करताना बरोबर विचारही करायला हवा.