अनुभवाचे ज्ञान

लडाख गावात सरस्वती विद्यामंदिर ही एक मुलावर चांगले संस्कार करणारी आदर्श शाळा होती. या शाळेतील चौथीच्या एका वर्गात एक शिक्षक गणित शिकवित होते.

वजाबाकीची उदाहरणे शिकवून झाल्यावर शिक्षकांनी वर्गातील विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला. “समजा, दहा मेंढ्या कोंडून ठेवल्या आहेत. त्यातील एक मेंढी उठून बाहेर बाहेर गेली, तर किती मेंढ्या उरतील? ज्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या विद्यार्थ्याने हात वर करावा.”

शिक्षकांनी वर्गात नजर फिरवली तर कधीही हात वर न करणाऱ्या शंकरने हात वर केला होता. शंकरचे गणित अगदीच कच्चे होते. त्यामुळे शंकरने उत्तर देण्यासाठी हात वर केलेला पाहून शिक्षकांनाही आश्चर्य वाटले. एव्हढेच नव्हे तर तो हात जोराने हलवीत होता.

शिक्षकांनी त्याला खुणावले तसा तो उठला. म्हणाला, “सर, एकही उरणार नाही.

शिक्षक म्हणाले, ‘शंकरा! तुला साधे गणित समजत नाही का? दहातली एक मेंढी गेली म्हणजे दहा वजा एक असा हा वजाबाकीचा साधा प्रश्न आहे. तर तू मात्र दहा मेंढ्यांमधून एक मेढी गेली तर एकही उरणार नाही? असे कसे सांगतोस?”

त्यावर शंकर म्हणाला, “सर, तुम्हाला गणिताचा अनुभव असेल. पण मला मेंढ्याचा आहे. माझ्या घरी पुष्कळ मेंढ्या आहेत. एखादी मेंढी जरी बाहेर गेली तरी बाकीच्या मेंढ्या त्या मेंढीचा अनुनय करीत एका पाठोपाठ एक सर्व मेंढ्या बाहेर पडतात. असे मी अनेकवेळा पाहिले आहे. मेंढ्यांचे वागणे मला नवीन नाही. ते मी रोजच पाहात असतो. म्हणूनच मी जे उत्तर दिले ते प्रत्यक्षात जे घडते त्यानुसार दिलेले उत्तर आहे. माझ्या मते मी दिलेले उत्तर हेच खरे उत्तर आहे.”

तात्पर्य – अनुभवातून आलेले ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ ज्ञान ठरते