विलंब नुकसानकारकच

सेनगुप्त राजाने आपल्या हयातीत आपले साम्राज्य खूप वाढविले होते. त्याच्या नंतर त्याचा पुत्र दासगुप्त गादीवर आला. अनेकवेळा दासगुप्ताने पाहिले होते की राज्यात एखादी समस्या उद्भवली तर त्याचे वडील राजा सेनगुप्त राज्यातील अनेकांशी सल्लामसलत करुन मग त्या समस्येवर तोडगा काढायचे. राज्यावर शत्रू हल्ला करणार आहे अशी बातमी गुप्तचरांनी आणली. राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्याला वडिलांची आठवण झाली. त्यांच्याप्रमाणे सल्लामसलत करुन त्यावर उपाय योजावा म्हणून दासगुप्ताने राज्यातील प्रत्येक समाज प्रमुखास दरबारात बोलावले व प्रत्येकाला सल्ला विचारु लागला. प्रथम सुताराला विचारले. सुतार म्हणाला, “राज्याचे रक्षण करण्यासाठी सीमेवर लाकडी भिंत बांधू!”चर्मकार म्हणाले, “चामड्याची भिंत जास्त चिवट होईल.”

त्यावर लोहार म्हणाला, “मला तरी वाटतं की लोखंडाचीच भिंत बांधावी. त्या इतकी मजबूत भिंत दुसरी कोणतीच असणार नाही.”
तेथे बसलेल्या वकिलांना हे काही सहन होईना. ते पटकन म्हणाले, “एव्हढं सगळं करण्यापेक्षा युक्तिवाद करुन आपण शत्रुपक्षाला पटवून देऊ की दुसर्‍याचं राज्य लुबाडणं किती अन्यायकारक आहे ते !

त्यानंतर सोनार, धर्मपंडीत, व्यापारी यांचे युक्तिवाद बराच काळ राजाला सांगणं सुरु होतं. त्यात निर्णय घ्यायला इतका विलंब लागला की शत्रू राजवाड्याच्या दाराशी येऊन पोहोचला आणि व्हायचे ते नुकसान झाले.

तात्पर्य : काही निर्णय झटपट घ्यायचे असतात.