लोभ आवरता आला नाही की घात हा ठरलेलाच असतो

एकदा अकबराने बिरबलाला विचारले की, ”राजउद्यानातील कोणीही पाहिलेली नाही अशी आश्चर्यकारक गोष्ट तू मला दाखवू शकशील का ?” त्यावर बिरबलाने तात्काळ ‘हो’ म्हटले. त्यासाठी बिरबलाने राजमहालातून भरपूर मध मागवून घेतला. त्या शाही उद्यानात वातमृग येत असे. अतिशय दुर्मीळ आणि मानवाची चाहूल लागताच क्षणात पळून जाऊन दिसेनासा होणारा हा प्राणी. बिरबलाने आणलेला सर्व मध त्या उद्यानातील गवतावर पसरवून टाकला. थोडावेळाने वातमृग आला. खाता खाता त्याला गवत गोड लागल्याने तो गवत खाण्यात गुंगून गेला. वातमृगाने तेथील सारे गवत खाऊन संपविले तेव्हा बिरबलाने आपल्या जवळील मधमिश्रित थोडे थोडे गवत त्याच्यासमोर टाकत टाकत त्याला राजवाड्यात नेले. गवत खाण्यात गुंतलेला वातमृग राजवाड्यात आला. बिरबल म्हणाला, ”महाराज, हे पहा उद्यानातील वेगळे आश्चर्य. जो वातमृग माणसाची चाहूल लागताच क्षणात दिसेनासा होतो तो आज भर दरबारात आला आहे.” राजाने लगेच त्या वातमृगाला आपल्या प्राणीसंग्रहालयात कोंडून ठेवले.
तात्पर्य – लोभ आवरता आला नाही की घात हा ठरलेलाच असतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.