माणसाची खरी किमत त्याच्या वागण्यातूनच कळते

एक श्रीमंत माणूस एकदा नदी काठावरील एका शंकराच्या देवळात दर्शनासाठी आले होते. देवळात शिरणार तेव्हढ्यात त्यांच्या मनांत आले की समोर नदीचे पात्र आहे त्यात स्नान करून ओलेत्यानी शंकराची पूजा करावी. म्हणून ते चालत नदीकाठाशी आले. काठावर हातपाय धूत असताना त्यांचा तोल गेला आणि ते नदीपात्रात पडले. त्यांना पोहता येत नव्हते. ते ओरडायला लागले. काठावर अनेक लोक होते पण त्यांना वाचविण्यासाठी कोणी पुढे येईना. शेवटी काठावर संध्या करीत असलेल्या एका साधूने हा आरडाओरडा ऐकला. तो साधू धावत त्या काठाजवळ आला. त्याने त्या माणसाला बुडताना पाहिले आणि क्षणार्धात पाण्यात उडी मारली. बुडणार्‍या त्याला धरून काठावर ओढत आणले. आणि त्याचा जीव वाचविला. थोडावेळाने तो श्रीमंत माणूस शुद्धीवर आला. ह्या साधूने आपला जीव वाचविला हे समजताच त्याने खिशात हात घालून नोटांची गठ्ठी बाहेर काढली आणि त्यातील एक रुपयाची नोट साधूच्या हातावर बक्षीस म्हणून ठेवली. हे पाहून आसपासचे लोक संतापले आणि त्या माणसाच्या अंगावर धावून गेले. एवढा जीव वाचविला त्याची एवढीशी किमत केल्याबद्दल लोक त्याला बोलू लागले. प्रकरण हातघाईवर येणार हे पाहताच साधूनी लोकांना शांत केले आणि म्हणाले, ‘‘त्यांना मारू नका त्यांनी स्वतःच्या किंमतीएवढी बक्षिसी मला दिली. त्यांची किंमत एक रुपया एवढीच आहे.’’
तात्पर्य – माणसाची खरी किमत त्याच्या वागण्यातूनच कळते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.