निर्मळ मन

“भिक्षा देही” म्हणत एक साधू महाराज मंगलाबाईच्या घरासमोर येऊन उभे राहीले. त्यांचा आवाज ऐकून मंगलाबाई भिक्षा घेऊन आल्या. त्या फार अस्वस्थ दिसत होत्या. बाहेर येऊन साधू महाराजांना म्हणाल्या, “महाराज, मी फार अस्वस्थ आहे. मला काहीतरी उपदेश करा.” साधू महाराज म्हणाले, ‘ ‘आज नाही, पण मी तुला उद्या उपदेश करीन.” महाराजांचे हे शब्द ऐकून मंगलाबाईंना अतिशय राग आला त्या फणकाराने म्हणाल्या, “मग तुम्हाला मी भिक्षाही उद्याच घालेन.” दुसर्‍या दिवशी साधू महाराज भिक्षा मागण्यासाठी पुन्हा त्या घराकडे निघाले. येताना त्यांनी आपल्या भिक्षा पात्रात थोडी माती घेतली. साधू महाराज आज येऊन उपदेश करणार म्हणून मंगलाबाई सुद्धा चांगले दान द्यायचे या विचाराने त्यांची वाट पाहात होत्या. साधू महाराजांनी घरासमोर येऊन ‘ ‘भिक्षां देही ” अशी आळी दिली. मंगलाबाई भिक्षा घेऊन आल्या. भिक्षा घालणार तितक्यात त्यांच्या लक्षात आले की, भिक्षा पात्रात माती आहे. त्या पटकन साधू महाराजांना म्हणाल्या, “महाराज, भिक्षापात्रात माती आणि कचरा आहे तर मी भिक्षा कशात घालू?” महाराज म्हणाले, “मला चालेल. तुम्ही भिक्षा घाला.” त्यावर मंगलाबाई म्हणाल्या, “भिक्षापात्रात माती असताना त्यावर मी अन्न घालणार नाही. ” त्यावर महाराज म्हणाले ‘ ‘भिक्षा पात्र स्वच्छ केल्यावरच तुम्ही भिक्षा घालणार ना. मग तोच तुम्हाला उपदेश आहे. काल तुम्ही दुःख आणि चिंतेनी ग्रासल्या होत्या, अस्वस्थ होत्या. मग मी तुम्हाला कसा उपदेश केला असता?” गुरुच्रा उपदेश घेताना मन अगदी निर्मळ असायला हवे.

तात्पर्य : मन निर्मळ असेल तर त्यात भर घालणारी प्रत्येक गोष्ट निर्मळच होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.