दुसर्‍याची मस्करी करण्यात आयुष्य वाया घालवू नये

एक वृद्ध मनुष्य रस्त्याने चालला होता. वृद्धत्वामुळे त्याची मान हलत होती. हात-पाय थरथरत होते आणि नजरेत म्हणावी एवढी दृष्टी पण नव्हती. वृद्धत्वाने तो थोडा कमरेतही वाकला होता. चौकात उभे असणार्‍या, चेष्टा-मस्करी करणार्‍या दोन-चार तरुणांचे लक्ष त्या वृद्ध माणसाकडे गेले. त्या वृद्ध माणसाची खोडी काढावी या उद्देशाने त्यातला एक तरुण त्यांना म्हणाला, ”म्हातारबा, इतकं खाली वाकून जमिनीवर काय शोधता ?” वृद्ध माणसाने कानाकडे बोट दाखवत ‘ऐकायला येत नाही, मोठ्याने बोल’ अशी खूण केली. त्यावर त्या मुलाने चेष्टेने मोठ्या आवाजात विचारले, ”इतका वेळ खाली वाकून शोधताय, जन्मभराचं काही हरवलयं का ?” त्या तरुण मुलांचा वात्रटपणा लक्षात येऊन त्या मुलांना चपराक बसेल असं उत्तर त्या वृद्ध माणसाने दिलं. ते म्हणाले, ”अरे बाबांनो, माझं वाया गेलेलं तारुण्य शोधतोय रे !”
तात्पर्य – दुसर्‍याची मस्करी करण्यात आयुष्य वाया घालवू नये.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.