कारण नसताना मनःस्ताप करून घेतला तर शरीरावर त्याचा परिणाम होणारच

एखाद्या व्यक्तीचा स्वभाव हा जगावेगळा असतो. समाजात राहून सुद्धा तो दहा माणसांप्रमाणे वागू शकत नाही. सुरेंद्रचा स्वभाव असाच काहीसा होता. समाजात कोठे अन्याय झाला, कोठे अत्याचार झाला की तो अस्वस्थ होत असे आणि त्या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना शासकीय अधिकार्यांकडे तक्रार करत असे. एवढ्या मोठ्या शासन व्यवस्थेत त्याच्याकडे कोण लक्ष देणार? या सगळ्याने त्याचा संताप अनावर व्हायचा, चिडचिड व्हायची. त्याचा राग तो घरातल्या व्यक्तींवर काढायचा. तुम्ही सगळे हा अन्याय कसा सहन करतात ? असे तो मित्रांना आणि आपल्या पत्नीला नेहमी ऐकवत असे. पत्नीही कधी कधी चिडून म्हणत असे, ‘‘लोकांच्या वागण्याचा तुम्ही एवढा त्रास का करून घेता ? ज्या गोष्टींशी आपला संबंध नाही तेथे माणसानी शांत बसावे.’’ ‘‘पण माझे वागणे प्रामाणिक असताना मी स्वस्थ का बसायचे ?’’ त्याचा हा अहंकार त्याला स्वस्थ बसू देत नसे. शेवटी ह्याचा व्हायचा तो परिणाम झालाच. सुरेंद्रला रक्तदाबाचा त्रास होऊ लागला. छातीतल्या कळांमुळे हृदयविकाराची शक्यता निर्माण झाली. शेवटी डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती घ्यायला लावली. जिवाच्या भीतीने सुरेंद्र बराच शांत झाला होता. एक दिवस पत्नी म्हणाली, ‘‘एवढा मोठा आजार कशामुळे झाला याचा आपल्या मनाशी विचार करा. जगात अन्याय नको म्हणून आपण आपल्या शरीरावर अन्याय का करून घ्यायचा.’’ सुरेंद्रला उशीरा का होईना पत्नीचे म्हणणे पटले.
तात्पर्य – कारण नसताना मनःस्ताप करून घेतला तर शरीरावर त्याचा परिणाम होणारच. 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.