पृथ्वी ही गोल आहे. जगात कुठे, कोणाची, कधी भेट होईल, भेटीतून काय घडेल आणि त्याचे परिणाम काय होतील हे कोणी सांगू शकत नाही. एकदा असेच घडले. एका नदीकिनारी जगातील सुंदरता फिरत फिरत आली. थोड्याचवेळात योगायोगाने जगातील कुरुपता सुद्धा फिरायला म्हणून त्या नदीवर आली. दोघींची एकमेकींशी ओळख झाली. आपापल्या अनुभवावरून दोघींच्या गप्पाही खूप रंगल्या. तेवढ्यात सुंदरतेच्या मनात आले या नदीच्या पवित्र पाण्यात स्नान केले तर आपण आणखी सुंदर दिसू. तिने आपला विचार कुरुपतेला बोलून दाखविला. कुरुपतेलाही ती कल्पना आवडली. त्या स्नानाची तयारी करू लागल्या. वस्त्रे उतरवून, काठावर ठेवून त्या नदीच्या पाण्यात उतरून स्नान करू लागल्या. स्नान झाल्यावर प्रथम कुरुपता काठावर आली आणि सुंदरतेच्या झगझगीत वस्त्रांवर भाळून ती वस्त्रे नेसून ती तिथून निघून गेली. थोडावेळाने सुंदरता काठावर आली. तिने आपली वस्त्रे शोधली पण कुरुपतेच्या वस्त्राशिवाय तेथे काहीच नव्हते. शेवटी कुरुपतेची वस्त्रं घालून ती पण तिथून निघून गेली. कपड्यांच्या या अदलाबदलीमुळे झगझगीत वस्त्रांमुळे कुरुपतेला लोकं सुंदरता समजू लागले आणि मुळात सुंदर असलेल्या सुंदरतेला फक्त वस्त्रांवरून कुरुपता म्हणू लागले. सर्व जगाने निव्वळ बाह्य पेहरावामुळे स्वत:चे मत बनवले. खरी सुंदरता कोणती याचा विचार केला नाही.
तात्पर्य – बाह्य सौंदर्यावरून मत न बनवता अंतरात्मा जाणून घ्यावा.
Leave a Reply