सातवीचा वर्ग भरला होता. मागच्या परीक्षेचा निकाल तितकासा समाधानकारक नव्हता. म्हणून वर्गशिक्षकांनी निकालाचा दर्जा वाढविण्यासाठी एक योजना आखली. त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांना जी गोष्ट अशक्य वाटते ती कागदावर लिहायला सांगितली. प्रत्येकाने कागदावर आपलं मन मोकळं केलं. ”मला बॅटींग करता येत नाही,” ”माझं अक्षर अतिशय वाईट आहे.” ”मला चित्रकलेत कमी मार्कस् पडतात.” ”मला शाळेत यायला उशीर होतो.” ”मला गणितं येत नाहीत.” प्रत्येकाने आपापली अशक्य गोष्ट कागदावर लिहिली. शिक्षिकेने ते सर्व कागद गोळा करून मुलांबरोबर त्या शाळेच्या मैदानात गेल्या आणि न वाचताच त्या सर्व कागदांची होळी केली. मग मुलांना म्हणाल्या, ”तुम्हाला ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्याची आपण होळी केली. त्या सर्वाची जळून राख झाली. तेव्हा मुलांनो आता तुमच्याजवळ शिल्लक काय राहिले ?” मुलांनी उत्तर दिले, ”जे शक्य आहे ते सगळं !” त्यांचं उत्तर ऐकून शिक्षिका सुखावल्या म्हणाल्या, ”म्हणजे आता प्रत्येक गोष्ट तुम्हाला येते आहे. फक्त ती मनापासून, कष्टानी करा ! तुमच्याजवळ आता सगळं शक्यच उरलं आहे हो की नाही ?” मुलांनी त्यावर मान डोलावली. पुढल्या परिक्षेचा निकालही उत्तम लागला.
तात्पर्य – नकारात्मकता काढून सकारात्मकतेने केलेले कार्य यश देतं.
Leave a Reply