मगधातील निसर्गरम्य मुक्त विद्यापीठात चंद्रगुप्ताचं शिक्षण सुरू झालं होतं. चार भितींनी वेढलेल्या विद्यापीठापेक्षा माणूस निसर्गाच्या सान्निध्यात अधिक काही शिकून जातो. ह्या विमुक्त, मंत्रमुग्ध वातावरणात हा निसर्ग हा देखील त्याचा आचार्य बनतो. निसर्गातूनही विद्यार्थ्याला वस्तुपाठ मिळतात. माणूस माणसाचा चटकन् मित्र बनत नाही. पण निसर्ग मात्र त्याचा चटकन् सखासोयरा बनून जातो. चंद्रगुप्ताचं शिक्षण अशाच मैत्रिपूर्ण निसर्गाच्या वातावरणात सुरू झालं होतं. आचार्य चाणक्य त्याला कधी एखाद्या गुहेत घेऊन बसे, तर कधी एखाद्या महावृक्षाच्या सावलीत त्याला धडे देई.
— भा. द. खेर (चाणक्य)