जादूगाराची जादू

एका जादूगाराचे जादूचे प्रयोग शिरपूर गावात एका मोकळ्या मैदानावर सुरू होते. रूमालातून कबुतर, काढ, टोपीतून सश्याचं पिलू काढ, असे प्रयोग करत तो प्रेक्षकांना रिझवत होता. दूरवर उभं राहून एक वाघ हे प्रयोग पाहात होता. त्याला या सगळ्याची गंमत वाटली. प्रयोग संपल्यावर तो जादूगाराजवळ आला आणि म्हणाला, तुझ्या टोपीतून मला वाघाचं पिलू काढून दाखव. हे ऐकताच घाबरला कारण तो करत होता ती हातचलाखी होती. तो वाघाची समजूत काढत होता की जादू ही खरी नसते. पण वाघाला पिलू हवेच होते. तो डरकाळी फोडायला लागला. जादूगार घाबरला पण जीव वाजवणे भागच होते. त्याने युक्ती केली. वाघाला सांगितले की, ‘वाघाचं पिलू काढायला त्याला वीस दिवस लागतील पण तोपर्यंत तुला फक्त दुधावर राहावे लागेल. वाघाने तसे कबुल केले. वीस दिवसांनी वाघ जादूगाराजवळ आला. जादूगाराने गावकऱ्यांना गोळा केले होते. वाघ दूधावर राहिल्यामुळे कृश झाला होता. त्याच्या अंगात त्राण उरले नव्हते. जादूगाराने मग टोपीवर मंत्र टाकून त्याखालून एक हडकुळे मांजर काढले आणि हे या मरतुकड्या वाघाचे पिलू आहे म्हणून सांगितले. ते ऐकून वाघाला राग आला तो जोरजोरात डरकाळ्या फोडू लागला. पण अंगात ताकद नसल्यामुळे डरकाळीचे आवाज न येता म्यॉव म्यॉव असा काहीतरी विचित्र आवाज येऊ लागला. आसपासचे लोक हसू लागले. आपली कोणाला भिती वाटत नाही तेव्हा हे गावकरी आपल्याला मारतील या विचाराने वाघ जंगलात पळून गेला हे पाहून जादूगाराने आपला जीव वाचला म्हणून सुटकेचा श्वास टाकला.

तात्पर्य : शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ.