वसंत आबाजी डहाके (कादंबरीच्या जन्माची कहाणी)

भाषा नव्हती त्या वेळची ही घटना आहे. आपल्यासमोर बसलेल्या दहाबारा माणसांना एकजण काहीतरी ‘सांगत’ होता. तो चीत्कारत होता. हुंकारत होता. सबंध चेहरा आणि डोळे यातून व्यक्त करत होता. समोरच्या धुळीत बोटांनी रेघोट्या ओढत होता. त्याचं सांगणं लोक ‘ऐकत’ होते. सांगणं संपलं तेव्हा सांगणारा अंगातलं त्राण गेल्यासारखा खाली मान घालून स्तब्ध बसून राहिला. ऐकणारे काही काळ स्तब्ध होते. नंतर ते आनंदाचे चीत्कार काढू लागले. त्या वेळी टाळ्या वाजवण्याची पद्धती रूढ झालेली नव्हती. पण रोजच्या सांगण्यापेक्षा आजचं सांगणं काहीतरी वेगळं आहे हे सर्वांना जाणवलेलं होतं. एरवी ते सांगणार्‍याला हू हू करत आणि स्वतः उठून निघून जात.

— वसंत आबाजी डहाके (कादंबरीच्या जन्माची कहाणी)