पु. भा. भावे (पहिला पाऊस)

‘गेले काही दिवस सारखी सरत्या उन्हाळ्याची तलखी चालली होती. जमिनीला भाजून तडा पडल्या होत्या. सगळा समुद्र तिने हपापल्या तोंडाने पिऊन टाकला असता. आभाळातून जळते निखारे गळत होते. कुठ्ठे कुठ्ठे हिरव्या गवताचा अंकुर म्हणून दिसत नव्हता. सारे कसे करडे, भकास आणि गरम ! पहाटे वारे वाहत ते सुद्धा कोमट कोमट ! आणि मग डोळे वटारून सूर्य वर आला की दाही दिशांना एकदम पेटलेल्या भट्टीचा तांबडा लाल रंग चढे, वाटे की हा सरता उन्हाळा कसला, या भयंकर तापाला आता कोठे अंतच नाही ! दुपारी सारे कसे मरगळून जाई. चोहीकडे शांत ! भडकत जाणार्‍या उन्हाचा मात्र ‘‘सुम्म’’ असा विलक्षण आवाज होई. मध्येच एखादी घार किलकिल करीत वर चढे. खार वरून टुकटुक पाही. चुकार गुरे कान हलवीत वळचणीचा आसरा शोधीत. आमचा पोपट खसताटीशेजारी लावलेल्या पिजर्यात आपल्या गोल डोळ्यांवर कातडी ओढून समाधी लावी. मोत्या कुत्रा लांहालांहा करीत न्हाणीघरात अंगाची गुंडाळी करून बसे. आणि नाकातून गरम वाफा सोडीत वारा मधूनच धावत जाई !

— पु. भा. भावे (पहिला पाऊस)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.