ना. म. घाटे (श्रीयुत ईश्वर)

महात्माजींनी एकवीस दिवसांचा उपवास सुरू केला हे ऐकिल्यापासून मला जगाची, खुद्द हिंदुस्थान सरकारची व भावी हिंदवी स्वराज्याची फार काळजी वाटू लागली. म्हातारा जाणार असे माझ्या मुखातून नकळत उद्गार व डोळ्यांतून पाण्याचे दोन थेंबही निघाले होते. महात्माजींना तशी राक्षसी आज्ञा देणार्‍या ईश्वराचा मला फार संताप आला होता. व तो हाती लागलाच तर त्या गाढवाचे चांगले कान पिळून ‘तू त्या म्हातार्‍याच्या जिवावर का उठलास’ असे त्याला हडसून खडसून विचारण्याचाही मी मनातल्या मनात निश्चय केला होता. पण महत्त्वाचा प्रश्न तर हाच होता की तो ईश्वर सापडावा कुठे. आम्ही ‘पार्क’ मध्ये हिंडत असता माझे मित्र श्री. गिताई यांना मी माझा प्रश्न सांगितला. ‘‘उं, त्यात काय मोठेसे !’’ श्री. गिताई उत्तरले, ‘‘‘स्थिरचर व्यापुनि अवघा तो जगदात्मा दशांगुले उरला,’ तुम्ही मनात आणाल तर तो जगदात्मा तुम्हाला या पार्कमध्ये देखील दिसून येईल.’’


– ना. म. घाटे (श्रीयुत ईश्वर)