उंटावरचा शहाणा

एका सावकाराच्या वाड्यात खूप मोठा जनावरांचा गोठा होता. गाई, म्हशी, वासरं तेथे सदैव बांधलेली असत. यातील एका वासराला अतिशय तहान लागली होती. कोणी पाणी पाजायला येईल म्हणून बराच वेळ वाट पाहिली. पाण्याशिवाय त्याचा जीव अगदी कासावीस झाला. शेवटी आसपास कुठे पाणी मिळते कौ हे पाहाण्यासाठी त्याने ओढाताण करून आपल्या गळ्याला बांधलेली दोरी तोडली आणि गोठ्यात इकडेतिकडे ते पाण्याच्या शोधासाठी हिंडू लागले. एका भिंतीजवळ एक लहानसे मडके होते. त्याच्या तळाला थोडेसे पाणी त्या वासराला दिसले. तहानलेल्या वासराने मागचा पुढचा विचार न करता पाणी पिण्यासाठी त्या मडक्यात तोंड घातले आणि लहानशा त्या मडक्यात त्याचे डोकेअडकले काही केल्या डोके बाहेर काढता येईना. तेव्हा सावकाराच्या माणुसांनी एका व्यक्तीला सल्ला देण्यासाठी बोलावून आणले. तो उंटावर बसून आला आणि ‘वासराचे डोके कसे काढायचे हे पाहाण्यासाठी वासराजवळ जावे लागेल. पण मी उंटावरून तेथे जाईन. त्यासाठी घराची भिंत पाडावी लागेल. मग सावकाराच्या नोकराने भिंत पाडून त्याची आत जाण्याची सोय केली. त्यानंतर हाउटावरचा शहाणा गोठ्यात वासराजवळ गेला. वासरू डोके काढण्यासाठी खूप धडपड करत होते. ते पाहून उंटावरचा शहाणा माणूस म्हणाला, आधी वासराची मान कापा म्हणजे मडक्यात त्याचे डोके सुरक्षित राहिल आणि त्यानंतर मडके फोडा म्हणजे कापलेले असले तरी डोके शाबूत राहिल. बघा कसा चुटकीसरशी प्रश्न सोडवला ते.

तात्पर्य : उंटावरच्या शहाण्यांकडून म्हणजे मूर्ख माणसाकडून असेच सल्ले मिळतात.