ब्रह्मदेशाचा (सध्याचा म्यानमार) राजा बोडायाया हा विशेष प्रसिद्ध होता. तो कुशल प्रशासक तर होताच, पण त्याचे सैन्यही बलाढ्य होते. त्याचे राज्य सर्वात बलिष्ठ समजले जाई. या शूर राजाचे अंतःकरण दयाळू होते. त्याने अनेक पॅगोडे बांधले आणि देशभरातील धर्मगुरूंची बडदास्त राखली.
बालपणाच्या मित्रांचीदेखील त्याने चांगली दखल घेतली. यु पॉ हा त्याचा मित्र. त्याच्याबरोबर एकाच धर्मगुरूकडे तो सहाध्यायी होता. बालपणापासून त्यांचे संबंध मैत्रीचे राहिले होते.
एक दिवस राजेसाहेब आपल्या लवाजम्यासह इरावद्दी नदीवर सहलीसाठी गेले. ब्रह्मदेशातील या सर्वांत मोठ्या नदीला ब्रह्मी लोक ‘इतरावत्ती माता’ म्हणतात. ते जिथे गेले होते, तिथे नदीचे पात्र विस्तीर्ण, नजरेच्या टप्प्यात न भरणारे होते. दिवस मावळला. राजाला कंटाळा आला. त्याला यु पॉ ची थट्टा करायची लहर आली. यु पॉ आता दरबारी खूशमस्कर्या होता. त्याला मंत्र्याचा दर्जा होता.
‘यु पॉ ही नदी ओलांडून जाशील का ?’
‘होय महाराज !’ त्याने तत्काळ उत्तर दिले.
‘तू मला खूश करण्यासाठी हे म्हणतोयस, हे मला ठाऊक आहे; पण ही थट्टा नाही.’
‘महाराज, खरंच मी नदी पार करून दाखवतो.’
‘मग आताच्या आता नदी ओलांड पाहू ।’
हे ऐकल्यावर यु पॉने आपला सॅरॉग वर उचलला आणि तो किनार्यावर येरझारा घालू लागला. बर्याच वेळाने राजाने विचारले,
‘ अरे, तू थांबलास का ?’
‘महाराज, मी बोटीची वाट पाहतोय.”
‘बोटीने तर कोणीही सामान्य माणूस जाईल, मग तूच कशाला हवा ?’!
युपॉने राजापुढे गुडघे टेकले. जमिनीवर डोके टेकवून तो म्हणाला,
‘महाराज, त्या सामान्यांतला मी एक सामान्य माणूस आहे.’
राजेसाहेब त्यावर खळखळून हसले, झालं!