संवाद

शतश: आभार………… आणि सुस्वागतम !!

मराठीसृष्टी आता नव्या रुपात आपल्या भेटीला आलेय. १९९६ मध्ये सुरु झालेला हा प्रवास आता एका मोठ्या, महत्त्वाच्या टप्प्यावर आलाय. वाचकसंख्या तर दिवसेंदिवस वाढते आहेच, पण नियमितपणे लेखन करणारेही मोठ्या संख्येने वाढतायत.

सामान्य नागरिकांपासून विविध विषयांतील तज्ज्ञांपर्यंत अनेकजण विविध विषयांवर इथे लिहितात. आपल्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार.

येणार्‍या काळात मराठीसृष्टीवर अनेक नव्या विषयांवर, नवनवे लेखक आपल्याशी संवाद साधणार आहेत. एक परिपूर्ण मराठी पोर्टल ही आपली ओळख आणखी ठसठसीत करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा तर आहेच.

कुठलीही वेबसाईट, पोर्टल किंवा एखादा ब्लॉग सुरु रहाण्यासाठी वाचकांची खरी गरज असते. मी असे बरेच ब्लॉग बघितले जे अतिशय चांगल्या विषयांना वाहिलेले होते. मात्र वाचकांच्या मर्यादित संख्येमुळे त्या ब्लॉगरचा उत्साह अवेळीच मावळून ते बंद पडले. अनेक चांगल्या वेबसाईटसचेही असेच झालेले दिसले.

तेव्हाच मराठीसृष्टीने निर्णय घेतला की हे पोर्टल व्यावसायिक दृष्टिकोनातूनच चालवायचे. व्यावसायिक याचा अर्थ केवळ धंदा पाहून असा नाही तर एकूणच professional attitude वापरुन पोर्टल चालवायचे. त्यासाठी उच्च दर्जाचे लिखाण, सोपी, सुलभ मराठी भाषा हे तर हवेच, पण विषयांमध्येही विविधता हवी. ओढूनताणून मराठी शब्द बनवून ते वापरण्यापेक्षा प्रसंगी रुळलेले इंग्रजी शब्द वापरणे आम्ही पसंत केले.

मराठीसृष्टीचे अनेक लेखक महाराष्ट्राबाहेर वास्तव्य करणारे आहेत. त्यामुळे व्याकरण आणि शुद्धलेखनाकडे लक्ष देतानाही त्याचा बाऊ किंवा अतिरेक केला नाही. शुद्ध – अशुद्ध ठरवणारे न्यायाधिश आपण कोण? “आनी-पानी” च्या भाषेची आम्ही टवाळकी केली नाही आणि विदर्भातल्या हिंदीमिश्रीत किंवा बडोदा-अमदाबादच्या गुजरातीमिश्रीत मराठीलाही तेवढंच महत्त्वाचं मानलं.

लेखकांना त्यांच्या लिखाणावर आलेल्या प्रतिक्रिया नियमितपणे मिळतील याची आम्ही काळजी घेतली.

विषयांतील वैविध्य हेही मराठीसृष्टीचे एक खास वैशिष्ट्य. पोर्टलवरील विविध वर्गवारींकडे बघतानाच त्याचा अंदाज यावा. आज अनेक ब्लॉग किंवा वेबसाईटसना त्यांच्या विषयांची लेबल लागलेली दिसतात. अमुक ब्लॉग खवैय्यांसाठी तर तमुक महिलांसाठी वगैरे वगैरे. मराठीसृष्टीने तसे होउ दिले नाही. मात्र वेगवेगळ्या विषयांवर लिहू इच्छिणार्‍या लेखकांसाठी काही खास व्यवस्था उभारण्यात पुढाकार घेतलाय. लवकरच त्याची माहिती आपल्याला मिळेल.

लवकरच मराठीसृष्टीच्या दैनंदिन वाचकसंख्येचा आकडा एक लाखावर जाईल. सामान्य मराठी माणसाच्या दैनंदीन जीवनातील घटना, त्याचे विचार, त्याची मते इतरांपर्यंत पोहोचवण्यात मराठीसृष्टीचा हातभार लागला याचा आनंद तर आहेच.

शेवटी पुन्हा एकदा मराठीसृष्टीच्या सर्व वाचकांचे आणि लेखकांचे मनःपूर्वक आभार!!!!