धैर्याचे महत्व

धैर्यधर नावाचे एक व्यापारी होते. व्यापार उत्तम चालत होता. आमदानी उत्तम होती. अर्थातच धैर्यधरांनी प्रामाणिकपणे ही संपत्ती कमावली होती. लोक त्यांना गमतीनं म्हणायचे, ”तुमचं नाव धैर्यधर आहे, पण तुम्ही आहात लक्ष्मीधर.” ”होय, मी लक्ष्मीधर आहे; पण मूळचा मी धैर्यधरच खरा.” धैर्यधर म्हणाले. बरीच वर्षे व्यापार केला. संसार सुखाचा झाला. आता जरा स्वास्थ्य आलं. धैर्यधरांनी विचार केला. ‘ ‘आता जरा हिंडावं, फिरावं, देश बघावा. तीर्थयात्रा करावी, जीवनाचा आनंद लुटावा. मग आपले सेवक आणि आपला एक पुतण्या यांच्यावर कारभार सोपवून धैर्यधर तीर्थयात्रेला गेले. काशी-रामेश्वर, हिमालयात गेले. दोन महिने ते बाहेर होते. आता परत आलो की, पेढीवर बसायचं या उद्देशाने ते परतीच्या वाटेला लागले. पण परत येऊन बघतात तो काय? पुतण्या आणि सेवक घरात हताशपणे बसले होते. ”काय झालं ?’ धैर्यधरांनी विचारलं. ‘ आपलं दुकान, पेढी सर्व आगीच्या अक्ष्यस्थानी पडलं. काही राहिलं नाही. आम्हीच कसेतरी वाचलो. आग कशी लागली समजलं नाही. ” पुतण्या म्हणाला. धैर्यधरांनाही क्षणभर अस्वस्थ वाटलं. पण ते म्हणाले, ”ठीक आहे. आता पुढे काय करायचं ते ठरवू” बर्‍याच लोकांना वाटलं, ‘आता काय होणार? सगळी राख झाली. आता धैर्यधर पुन्हा व्यवसाय सुरू करणार नाहीत.’ दुसर्‍याच दिवशी त्या जळालेल्या दुकानावर लोकांना एक फलक दिसला. ‘दुकान जळलं. पेढी जळली, सारं काही जळलं; पण धैर्य नाही जळलं! उद्यापासून दुकान पुन्हा सुरू करीत आहोत.’ लोकांना पटलं की, धैर्यधर हे नुसतेच लक्ष्मीधर नसून खरेच धैर्यधर आहेत.

तात्पर्य : संकटाना धैर्याने तोंड दिलं तर मार्ग सापडतो.