एखाद्या व्यक्तिचा स्वभाव हा जगावेगळा असतो. समाजात राहूनही तो दहा माणसांप्रमाणे वागू शकत नाही. सुरेंद्रचा स्वभाव असाच काहीसा होता. समाजात कोठे अन्याय झाला, कोठे अत्याचार झाला की तो अस्वस्थ होत असे. आणि त्या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना शासकीय अधिकार्यांकडे तक्रार करायचा. एव्हढ्या मोठ्या शासन व्यवस्थेत त्याच्याकडे कोण लक्ष देणार. या सगळ्यानी त्याचा संताप अनावर व्हायचा, चिडचिड व्हायची, त्याचा राग तो घरातल्या व्यक्तींवर काढायचा. ‘ ‘तुम्ही सगळे हा अन्याय कसा सहन करता?” असे तो मित्रांना आणि आपल्या पत्नीला नेहमी ऐकवत असे. पत्नीही कधी कधीचिडून म्हणत असे, ” लोकांच्या वागण्याचा तुम्ही एव्हढा त्रास का करून घेता?” ज्या गोष्टींशी आपला संबंध नाही तेथे माणसानी शांत बसावे. ” ‘ ‘पण माझे वागणे प्रामाणिक असताना मी स्वस्थ का बसायचे?” शेवटी त्याचा हा अहंकार त्याला स्वस्थ बसू देत नसे आणि ह्याचा व्हायचा तो परिणाम झालाच. सुरेंद्रचा रक्तदाबाचा त्रास आणखी वाढला. छातीतल्या कळांमुळे हृदयविकाराची शक्यता निर्माण झाली. शेवटी डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती घ्यायला लावली. जिवाच्या भीतीने सुरेंद्र बराच शांत झाला होता. एक दिवस पत्नी म्हणाली, ‘एव्हढा मोठा आजार कशामुळे झाला याचा आपल्या मनाशी विचार करा. जगात अन्याय नको म्हणून आपण आपल्या शरीरावर अन्याय का करून घ्यायचा. ‘
सुरेंद्रला उशीरा का होईना पत्नीचे म्हणणे पटले.
तात्पर्य : कारण नसताना मनस्ताप करून घेतला तर शरीरावर त्याचा परिणाम होणारच.