हुशार खेडूत

एका शहराच्या भरचौकात एक भली मोठी शिळा पडलेली होती. शिळा खूपच मोठी असल्याने रहदारीस अडथळा निर्माण झाला होता. ती हटविण्यासाठी काही अभियंत्यांना पाचारण करण्यात आले.

शिळा कशी हटवावी आणि हटविण्यास किती खर्च येईल, अशी विचारपूस त्यांच्याकडे करण्यात आली.

एक अभियंता म्हणाला, ‘या शिळेचे तुकडे करावे लागतील आणि ते भरून न्यावे लागतील. याकरिता जवळजवळ आठ हजार रुपये खर्च येईल.’

दुसर्‍या अभियंत्याने सल्ला दिला, ‘शिळा वाहून नेण्यासाठी एक मोठी मजबूत अशी लोखंडी हातगाडी तयार करायची. तिच्यावर शिळा ढकलत ठेवायची आणि गावाबाहेर नेऊन टाकायची. यासाठी सहा हजार खर्च येण्याची शक्यता आहे.’

तिथे एके खेडूतही उपस्थित होता. या लोकांच्या गोष्टी तो ऐकत होता. ते ऐकून तो म्हणाला, ‘ही शिळा मी फक्त शंभर रुपयाच्या खर्चात इथून नाहीशी करू शकतो.’

‘तू ही शिळा कशी काय अदृश्य करणार?’ त्याला विचारण्यात आले.

यावर तो म्हणाला, ‘या शिळेच्या जवळ मी एक मोठा खड्डा खणून घेईन. त्या मोठ्या खड्ड्यात ही शिळा मग ढकलून द्यायची. खोदलेली माती तिच्यावर पसरून द्यायची आणि त्यावर रस्ता बांधून काढायचा.’

मग सर्वांना खेडुताचीच योजना पसंत पडली.