सज्जनपणाचे वास्तव

उत्तरप्रदेशातील एक कुविख्यात दरोडेखोर. त्याचं सगळं आयुष्य दरोडेखोरीतच गेलं होतं. त्याचा मुलगा पंधरा वर्षांचा झाल्यावर तो त्याला दरोडेखोरीचे प्रशिक्षण देऊ लागला. तसेच त्या व्यवसायाची काही गुपिते त्याने आपल्या भूगला शिकवायला सुरुवात केली. शिकवताना तो आपल्य मुलास सांगत असे, अरे, तुझ्या चोरीची सुरुवात चांगली व्हायला हवी. कुठेतरी जाऊन दरोडा घालशील आणि नवीन असल्यामुळे पोलिसांच्या सापडून खडी फोडायला जाशील. असं होऊ नये म्हणून मी सांगतो त्याच ठिकाणी तू आयुष्यातील पहिली चोरी कर. ‘ असे म्हणून त्या दरोडेखोराने आपल्या मुलास एका जंगलात नेले व समोरच असलेली एका साधूची झोपडी त्याला दाखवली आणि म्हणाला, ‘ ‘हे तुझ्या पहिल्या चोरीचं ठिकाण. ” ती झोपडी पाहून मुलाने आश्चर्याने विचारले, ‘या झोपडीत चोरी करून काय मिळणार?’ त्यावर दरोडेखोर म्हणाला, ‘ ‘अरे त्या झोपडीत चोरी केलीस तर तिथे पोलीस येत नाहीत आणि दुसरं म्हणजे त्या साधुला लोकं सोनं, चांदी, फळं, पैसे इ. भरपूर देतात आणि तो साधू त्या वस्तू सर्वांना वाटत असतो. जर सगळं लोकांना वाटणारच आहे तर मग त्या आपण का चोरून आणू नये? गेली पस्तीस वर्षे मी तिथे चोरी करतो आहे तरीही त्या साधूने कधीही पोलिसात तक्रार केली नाही. हे ऐकून मुलाला आश्चर्य वाटले. तो वडिलांना म्हणाला, ‘ ‘म्हणजे’ तुम्ही पस्तीस वर्षे चोरी करूनही त्या साधूला काहीही कमी पडले नाही आणि तुम्हाला मात्र इतकी वर्षे झाली तरी अजूनही चोरी करावी लागते. याचा अर्थ असाच होतो की, सज्जनपणाने जगल्यानेच श्रीमंती प्राप्त होते. मग हा चोरीचा व्यवसाय करण्यापेक्षा मी त्या साधूकडेच जाऊन राहातो. असे म्हणत तो मुलगा साधूच्या झोपडीकडे चालायला लागला.

तात्पर्य : सज्जनपणाने जगल्याने सर्व काही प्राप्त होते.