प्रा. डॉ. बा. वा. दातार (दोन तात्या)

समीक्षेच्या क्षेत्रात जुन्या-नव्याची मीमांसा होत असली आणि जुनी कथा सरस व भावनासंपन्न की नवी कथा अधिक कलात्मक ह्याची चिकित्सा व चर्चा होत असली तरी कथाप्रेमी वाचकाला तिच्या वाचनीयतेचे व वेधकतेचे महत्त्व विशेष असते. कथा जुन्या वळणाची की नव्या ह्या प्रश्नापेक्षा ती वाचनीय व रमणीय आहे की नाही हेच तो बघत असतो व कथेच्या चांगुलपणाची कसोटी त्याला पुरेशी वाटते. कथा ही वाचकांसाठी असते ही त्याची समजूत असते. शिवाय एखाद्या भूप्रदेशाच्या सीमा ज्या काटेकोरपणे निश्चित करता येतात त्या काटेकोरपणाने साहित्यक्षेत्रातील नव्या-जुन्या सीमारेषा अलग व निश्चित करता येत नाहीत.

– प्रा. डॉ. बा. वा. दातार (दोन तात्या)