न्याय सर्वांसाठी

एका राजाने आपल्या महालाबाहेर एक मोठी घंटा बांधून त्याची दोरी खाली सोडली होती. कोणीही सामान्य माणसाने यावे व ती घंटा वाजवून राजाकडे न्याय मागावा अशी त्या न्यायी राजाची व्यवस्था होती.

एकदा एक अत्यंत हडकुळा, अशक्त बैल रस्त्याने जाता-जाता महालाबाहेरील हिरव्या वेलीची पाने खाऊ लागला. वेलीच्या बाजूलाच लोंबकळत असलेली त्या न्यायाच्या घंटेची दोरी त्याच्या तोंडात आली व त्याने मान फिरवताच घंटा वाजू लागली. अचानक घंटा वाजलेली पाहून राजाने घंटा वाजवणाऱ्याला दरबारात आणण्याचा फर्मान काढले. पाहातात तर तेथे कोणीच व्यक्ती नव्हती पण तेथे तो बैल होता. त्या बैलालाच शिपाई घेऊन आले.

पण बैल तो, तो काय बोलणार? फिर्यादच करू शकला नाही तर त्याला काय न्याय देणार? म्हणून त्याला सोडून देणार तोच मुख्य प्रधान पुढे सरसावला व म्हणाला, “महाराज, या बैलाने घंटा वाजवली म्हणजे नक्कीच त्याची काहीतरी फिर्याद असणार. पहा, तो म्हातारा आहे. म्हणजे मालकाने त्याच्याकडून भरपूर काम करून घेतले व म्हातारपणी त्याला चाराही न देता सोडून दिले. भुकेपोटी हिंडत तो येथे आला व वेल खाऊ लागला. याचा अर्थ त्याच्या मालकाने त्याच्यावर अन्याय केला आहे. महाराज तो आपण दूर करावा.”

प्रधानाचे म्हणणे न्यायी राजाला पटले. त्याने तात्काळ बैलाच्या मालकाला बोलावून त्याला दंड केला व बैलाला नीट सांभाळण्यास सांगितले.

तात्पर्य : मुक्या प्राण्यालाही न्याय मिळाला पाहिजे.