ना. सी. फडके (माणूस जगतो कशासाठी)

पाणी, गळफास आणि आग यांपैकी एकही भानगड आपल्याला साधायची नाही असे त्याला वाटले. विषाबद्दल तो विचार करू लागला, पण काही वेळ विषारी पदार्थांची नावेच आठवेनात, व ती आठवली तरी ते पदार्थ कसे मिळवायचे त्याची त्याला कल्पना येईना. अफूच्या दुकानात सरळ जाऊन अफू कशी मागायची ? किवा एखाद्या विलायती औषधांच्या दुकानात जाऊन विषारी पदार्थ कसा मागायचा ? दुकानदाराने कशाला, काय असे चौकस प्रश्न केले, की आपण खास घाबरून जाऊ असे भास्करला वाटले…त्याची मती नीटशी चालेना. मरायचं ठरवलं तरी ते वाटतं तितकं सोपं नाही याचा त्याला विलक्षण चमत्कार वाटला. त्याने आजूबाजूस पाहिले, जो तो मरायचं टाळीत होता. मोटारी, ट्रामगाड्या असे कितीतरी यमदूत लोकांच्यावर चाल करून जात होते; आणि त्यांच्या हल्ल्यातून लोक सफाईने आणि मोठ्या तत्परतेने आपापला बचाव करून घेत होते.

— ना. सी. फडके (माणूस जगतो कशासाठी)