अंतर्ज्ञान

दोघं मित्र एका गणपतीच्या देवळात दर्शनासाठी आले होते. देवळाच्या गाभाऱ्यात एक आंधळा बसला होता. ते पाहून रमेश गोविंदाला म्हणाला, ‘ ‘ह्या बाजूला बसलेल्या त्या व्यक्तिला पाहिलसं का ? तो आंधळा आहे पण गावातील विद्‌वान पंडित आहे. ” रमेशचे म्हणणे गोविंदाला पटेना. शेवटी गोविंदा त्या आंधळ्याजवळ गेला. त्याला आपली ओळख सांगून गोविंदा त्याच्याशी गप्पा मारू लागला. गप्पा मारता मारता तो जन्मापासून आंधळा आहे हे गोविंदाच्या लक्षात आले. पण तो पंडित आहे यावर त्याचा विश्वास बसेना. म्हणून गोविंदाने त्याला विचारले, ‘ ‘या देवळाच्या गाभाऱ्यात आपण रोज कुणाचं चिंतन करता? आपल्या अभ्यासाचा नक्की विषय कोणता आहे?” यावर तो आंधळा म्हणाला, ‘ ‘मी खगोलशास्त्राचा अभ्यासक आहे. ” हे त्याचे उत्तर गोविंदाला पटेना. ‘ ‘तुम्हाला अजिबात दिसत नाही मग तुम्ही ग्रह ताऱ्यांचे निरीक्षण कसं करता?” या त्याच्या संशयाने विचारलेल्या प्रश्नावर आंधळा स्वतःच्या छातीवर हात ठेवून म्हणाला, ‘ ‘अरे, ह्याच्या आतील सर्व ग्रह ताऱ्यांचे मी निरीक्षण आणि अभ्यास करत असतो. आता तरी कळलं का?”

तात्पर्य : बाह्य ज्ञानापेक्षा अंतर्ज्ञान जाणून घेण्यातच विद्‌वत्ता आहे.