एका सलूनमध्ये बरीच गर्दी झाल्यामुळे, ‘जगात देव आहे का नाही ‘ या विषयावर रिकाम्या गिर्हाइकांचा आणि सलूनच्या मालकाचा जोरजोरात वाद चालला होता. तो मालक म्हणाला, ‘ ‘साहेब जगात देव वगैरे काहीही नाही. सगळं थोतांड आहे. देव असता तर घराबाहेर डोकावून पाहिल्यावर लंगडे, लुळे,पांगळे आणि आजारी लोकं पाहायलाच मिळाले नसते. ” सलूनच्या मालकाची ही सर्व बडबड ऐकणारे गिर्हाईक आपली कटींग उरकून, या सलून मालकाला देवाच्या अस्तित्त्वाची जाणीव करूनच द्यायची असे ठरवून, मालकाला कटींगचे पैसे देऊन शांतपणे बाहेर पडले. तेवढ्यात दाढी आणि केस वाढलेला एक कळकट माणूस त्या गिर्हाईकाला बाहेर रस्त्यावरच दिसला. त्याला बरोबर घेऊन तो पुन्हा सलूनमध्ये गेला. त्याने त्या सलून मालकाला सांगितले, ”जगात जसा देव नाही तशी माणूसकी पण शिल्लक राहिलेली नाही. या बिचार्याची पैशाशिवाय कटींग कोण करणार?” ते ऐकून सलून मालक म्हणाला, ‘ ‘साहेब मी आहे नं!” त्यावर गिंर्हाईक म्हणाले,’ ‘अरे, तुझ्यासारखे माणूसकी असलेले चांगले कारागीर असते तर रस्त्यावरून दाढी केस वाढवून लोकं हिंडलीच नसती. ‘ त्यावर सलून मालक म्हणाला, ‘ ‘साहेब ती लोकं आमच्याकडे आली तरचआम्ही त्यांचे केस कापून देणार.” त्यावर गिर्हाईक म्हणाले, ”देवाचेही तसेच आहे, आपण त्याच्याकडे गेलो तरच तो कृपा करेल. त्याचे अस्तित्वच जर आपण मानले नाही तर तो कृपा तरी कोणावर करणार?’ ‘ गिर्हाईकाची ही वाक्य ऐकून सलूनचा मालक खजील झाला. आणि देवाचे अस्तित्त्व त्यानी मान्य केले.
तात्पर्य : मनात भावना असली तरच देवाचे अस्तित्व असते. भाव तेथे देव.