विश्वनाथच्या गुरुकुलात अनेक शिष्य विद्याजर्नसाठी वास्तव्याला होते. विश्वनाथांना एक तरुण अशी उपवर कन्या होती. विश्वनाथांनी तिचा विवाह करायचे ठरवले. वर संशोधन करीत असता एक दिवस त्यांच्या मनात आले की आपल्याच शिष्यांपैकी एकाला जावई म्हणून करून घ्यावा.
सर्व शिष्यांमधला सर्वोत्तम शिष्य कोणता? हे पाहाण्यासाठी त्यांनी सर्व शिष्यांना बोलविले आणि सांगितले की, ‘ ‘तुम्ही कोणाच्याही नजरेस न पडता कोठूनही एखादी मौल्यवान वस्तू चोरून आणून मला दाखवायची. असे जो करेल त्याला मी जावई करून घेईन.
सर्व शिष्य गुरुकुलातून बाहेर पडले. ज्याला जेथून जमेल तेधून अनेक मौल्यवान वस्तु चोरून आणून त्यांनी आपल्या गुरुंकडे दिल्या. अपवाद फक्त सोमनाथाचा होता. काहीही न आणता विश्वनाथांच्या समोर उभा होता.
विश्वनाथांनी त्याला त्याबद्दल विचारता त्याने उत्तर दिले, ‘ ‘गुरुवर्य, मी तुमची आज्ञा पाळू शकलो नाही म्हणून मला क्षमा करा. चोरी करू नये, हे आपणच मला शिकवता आणि चोरी करताना कोणी पाहाणार नाही अशी जागा कोठेही नाही. कारण इतर कोणीही नसले तरी चोरी करतांना मी मला पाहाणारच होतो. ”
त्याचे हे उत्तर ऐकून विश्वनाथ आनंदित झाले आणि म्हणाले, ‘ ‘माझ्या परीक्षेत तू पास झाला आहेस. मी शिकविलेले सर्व संस्कार तू योग्य रीतीने आत्मसात केले आहेस. तुझ्या ह्या प्रामाणिकपणाने मी भारावून गेलो आहे. माझा जावई होण्यास तू एकटाच लायक आहेस.”
तात्पर्य : आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला जे पटेल तेच योग्य असे समजून करावे.