नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर

करमचंद नावाचे एक व्यापारी होते. त्यांचं आधी छोटंसं दुकान होतं. नंतर हळूहळू जम बसून मोठं दुकान झालं. तिजोरी भरली. मग त्यांनी राहण्यासाठी मोठी जागा घ्यायचं ठरवलं. मग एक जागा बघून तिथे त्यांनी मोठी हवेली बांधली; पण अवतीभोवती दलदल व तुंबलेल्या गटारांमुळे येणार्‍या दुर्गंधीने ते कंटाळले. लाखो रुपये खर्च करून हवेली बांधली खरी; पण घराभोवतीच्या दुर्गंधीमुळे ती सोडावी लागणार याचं त्यांना दुःख झालं. त्यांचा कपूरचंद नावाचा एक घनिष्ट मित्र होता. तो कल्पक होता. त्याने करमचंदांना सांगितले, ‘या दुर्गंधीच्या त्रासाने हवेली सोडण्यापेक्षा एक वर्षभर ती माझ्या ताब्यात दे. मी तुला चमत्कार करून दाखवतो.’ त्याप्रमाणे हवेली कपूरचंदकडे व पेढीचा कारभार मुनिमाकडे सोपवून करमचंद एक वर्षभर तीर्थयात्रेला गेले. इकडे कपूरचंदने तो संपूर्ण दलदलीचा परिसर स्वच्छ करून तिथे माती आणून टाकली व निरनिराळ्या प्रकारच्या सुगंधी फुलांची झाडे लावली. बांधावर मोठी झाडं लावली. एक वर्षाच्या आत चमेली, मोगरा, गुलाब, तुळस या सर्वांनी बाग फुलून गेली. आता दूरवरून दुर्गंध आला तरी झाडे तो थोपवू लागली आणि वार्‍याच्या झोताबरोबर येणार्‍या सुगंधाने हवेली भरून गेली. करमचंद यात्रेहून परतले तेव्हा मध्यरात्र होती. त्यावेळी त्यांना काहीच दिसलं नव्हतं; पण पहाटे जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा ते सुगंधाने मोहरून गेले. अरुणोदयाला त्यांना बागेचं मोहक दृश्य दिसलं. कपूरचंदने कमाल केली होती. आता हवेलीत उदबत्या लावण्याची गरज नव्हती; कारण कपूरचंदने फुलझाडांच्या कितीतरी उदबल्या लावल्या होत्या.

तात्पर्य: कृत्रिम उपायांपेक्षा नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करावा.