नागकेशर

 

लेखक : विश्वास पाटील
किंमत : रु. ४५०/-
पाने : ४०४
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
ISBN : 9789353172244
बाइंडिंगचा प्रकार : 
वर्गवारी : राजकीय कादंबरी

ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांची ‘नागकेशर ही कादंबरी मराठी साहित्यविश्वात दाखल झाली आहे. त्यांच्या अन्य कादंबऱ्यांप्रमाणेच बहुपेडी असं कथासूत्र लाभलेली आणि उत्कंठावर्धक वळणांनी पुढे सरकरणारी ही कादंबरी आहे.

ही कादंबरी साखर कारखान्यातील कौटुंबिक सत्तासंघर्षावर आधारित आहे. डोंगरे-देशमुख या एकाच कुटुंबातील बापूराव आणि बबननाना या दोन भावांमध्ये गजरा सहकारी साखर कारखान्यातील सत्तेसाठी सुरू झालेल्या आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांतही पोचलेल्या संघर्षाचं हे चित्रण आहे.

प्रथम शाळामास्तर असलेले बापूराव  गजराचे चेअरमन होतात, तर बबननाना कारखान्यात शिरकाव करण्याच्या हेतूने वरकरणी बापूरावांच्या हितचिंतकाची भूमिका घेतात. बापूंचा मुलगा राजकुमार अर्थात प्रिन्स आणि नानांचा मुलगा बाजीराव ही पुढची पिढी.  प्रिन्सशीr आपला विवाह व्हावा अशी इच्छा बाळगणाऱ्या नेत्रादेवीला विचित्र दैवगतीमुळे बाजीरावच्या गळ्यात वरमाला घालावी लागते; तर नवऱ्याच्या (रमेशच्या) छळाला व मारझोडीला कंटाळून आश्रयाला आलेल्या जिद्दी, करारी व देखण्या शलाकाचा, प्रिन्स पत्नी म्हणून स्वीकार करतो.

गजरा सहकारी साखर कारखान्याची सत्ता आणि अन्य सत्ताकेंद्रे प्रिन्स आणि शलाकाच्या हातातून काढून घेण्यासाठी नेत्रा, बाजीराव, बबननाना, त्यांची पत्नी चंचला षड्यंत्र रचतात. त्यानंतर स्थानिक पातळीवर चाललेला हा संघर्ष राज्य पातळीवरील राजकारणापर्यंत पोचतो, ते शलाका आमदारकीच्या निवडणुकीला उभी राहते तेव्हा. त्या आखाड्यात मग नेत्रा-बाजीरावचा मुलगा सुपरप्रिन्स, रमेश-शलाकाचा मुलगा अभिषेक हे दोघं उतरतात.

तर आधी स्थानिक पातळीवरचं राजकारण, मग राज्य पातळीवरचं राजकारण, त्यात एकाच कुटुंबातील भावाभावांचा संघर्ष अशा कॅन्वहासवर हे कथानक विश्वास पाटील यांनी गुंफलं आहे. प्रिन्सचा विवाह दोन दिवसांवर येऊन ठेपलाय आणि वाग्दत्त वधू नेत्राला डावलून विवाहित असलेल्या शलाकाशी विवाह करण्याचा निर्णय प्रिन्स घेतो, अशा नाट्यमय प्रसंगाने या कादंबरीची सुरुवात होते.  या पहिल्याच प्रसंगातून बापूराव, प्रिन्स आणि शलाका या व्यक्तिरेखांचा परिचय होतो आणि अशा नाट्यमय प्रसंगाने सुरू झालेली ही कादंबरी त्यातील सघर्षामुळे उत्तरोत्तर रंगत जाते.

यातील व्यक्तिरेखा पाटील यांनी उत्तम रंगवल्या आहेत. बापूराव राजकारणाच्या रंगात रंगलेले असले तरी आपल्या हातून घडलेल्या काही चुकांची जाणीव त्यांना आहे. गावाला त्यांनी प्रगतिपथावर नेऊन ठेवलं आहे; पण बबननाना या अस्तनीतल्या सापाला पोसण्याची मोठी चूक त्यांच्या हातून घडली आहे आणि त्याचे परिणाम प्रिन्स आणि शलाकाला भोगावे लागतात. नेत्रा, बाजीराव, बबननाना, त्यांची पत्नी चंचला हे सत्तेसाठी हीन पातळी गाठणाऱ्या वृत्तीचे प्रतिनिधित्व करतात. तर प्रिन्स आणि शलाका सद्गुणांच्या साहाय्याने प्रगतिपथावर जाऊ पाहतात. सुष्ट आणि दुष्ट यांची ही लढाई पाटील यांनी व्यामिश्रतेने रंगवली आहे. रमेश, त्याचा आणि शलाकाचा मुलगा अभिषेक यांच्या उपकथानकातून या संघर्षाला एक वेगळंच वळण लागतं आणि नेत्राच्या हिडीसपणाचं दर्शन घडतं. साखर कारखान्यातील राजकारण, गावातील राजकारण याचं नेमकं चित्रण  पाटील यांनी केलं आहे.

माणसाच्या सत्तापिपासेचं, स्वार्थांधतेचं चित्रण पाटील यांनी अतिशय वास्तवतेने केलं आहे. माणसाच्या हीन, नीच वृत्तीसाठी त्यांनी योजलेली नागकेशर ही प्रतिमा अतिशय समर्पक वाटते. त्या प्रतिमेमुळे या कादंबरीला एक वेगळं परिमाण लाभलं आहे आणि म्हणूनच या कादंबरीचं ‘नागकेशर’ हे शीर्षकही सार्थ ठरतं. सनसनाटी प्रसंगांनी रंगलेलं हे संघर्षनाट्य मुळातून वाचावं असं आहे. पाटलांच्या वैशिष्ट्यपूर्ण भाषेमुळे ही कादंबरी वाचनीय झाली आहे.

— अंजली पटवर्धन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*