गीतरामायणाचे रामायण !

गीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला. साधारण १९५३ साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले.श्री सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले होते नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला.रामायणात वाल्मीकींनी २८००० श्लोकांत रामकथा लिहिली आहे.गदिमांनी तीच रामकथा एकूण ५६ गीतांत शब्दबध्द केली आहे.

माडगूळकरांनी श्रीराम कथेचा भाग एकेका रामायणी व्यक्तीच्या तोंडून गीतातून प्रकट केला आहे, या कथाभागात एकूण २७ व्यक्ती येतात. सर्वाधिक दहा गीते ही श्रीराम या चरित्र नायकाच्या तोंडी आहेत, त्या खालोखाल सीतेची आठ, कौसल्या व लव-कुश प्रत्येकी तीन, दशरथ, विश्वामित्र, लक्ष्मण, सुमंत, भरत, शूर्पणखा व हनुमंत यांच्या तोंडी प्रत्येकी दोन तर निवेदक, यज्ञपुरुष, अयोध्येतील स्त्रिया, आश्रमीय, अहिल्या आणि इतर सर्वजण यांच्या तोंडी प्रत्येकी एक गीत घातलेले आहे.

संपूर्ण ५६ गीतांसाठी सुधीर फडके यांनी ३६ रागांचा वापर केला आहे. यात मिश्र काफी चार, मिश्र जोगिया चार, भैरवी चार, भीमपलास, मिश्र मोड, मिश्र पिलू, पुरिया धनाश्री, शंकरा, केदार व मारु बिहाग प्रत्येकी दोन, अशा या २६ रचना सोडल्या तर उर्वरित ३० स्वररचना या २६ रागांत एकेक व दोन लोकगीतांवर आधारित आणि दोन स्वतंत्रपणे निर्मित आहेत. २६ रागांत भूप, मिश्र देशकार, देस, बिभास, बिहाग, मिश्र भैरव, मिश्र बहार, मधुवंती, तोडी, मिश्र खमाज, जोगकंस, अडाणा, यमन कल्याण, मिश्र हिंडोल, शुध्द सारंग, ब्रिंदावनी सारंग, मुलतानी, तिलंग, मालकंस, सारंग, हिंडोल, मिश्र आसावरी, यमनी बिलावल, शुध्द कल्याण व मिश्र पहाडी यांचा समावेश आहे.

आकाशवाणीने प्रसारित केलेल्या गीतरामायणाचे निवेदन पुरुषोत्तम जोशी यांनी केले आहे.

गायक व गायिका :

सुधीर फडके, माणिक वर्मा, राम फाटक, वसंतराव देशपांडे, व्ही.एल.इनामदार, सुरेश हळदणकर, बबनराव नावडीकर, चंद्रकांत गोखले, गजानन वाटवे, ललिता फडके, मालती पांडे, प्रमोदिनी जोशी, मंदाकिनी पांडे, योगिनी जोगळेकर, कुमुदिनी पेडणेकर, लता मंगेशकर, सुमन माटे, जानकी अय्यर, सौ.जोग.

वादक : प्रभाकर जोग, अप्पा इनामदार, अण्णा जोशी, सुरेश हळदणकर, केशवराव बडगे.

गीते:

१) कुश लव रामायण गाती : सुधीर फडके
२) सरयू तीरावरी : प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे
३) उगा का काळिज माझे उले : ललिता फडके
४) उदास कां तूं ? : बबनराव नावडीकर
५) दशरथा,घे हे पायसदान : सुधीर फडके
६) राम जन्मला ग सखी : समूह गान
७) सांवळा ग रामचंद्र : ललिता फडके
८) ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा : राम फाटक
९) मार ही ताटिका रामचंद्रा : राम फाटक
१०) चला राघवा चला : चंद्रकांत गोखले
११) आज मी शापमुक्त जाहले : मालती पांडे
१२) स्वयंवर झाले सीतेचे : सुधीर फडके
१३) व्हायचे राम अयोध्यापति : समूह गान
१४) मोडुं नका वचनास : कुमुदिनी पेडणेकर
१५) नको रे जाउ रामराया : ललिता फडके
१६) रामाविण राज्यपदी कोण बैसतो ? : सुरेश हळदणकर
१७) जेथे राघव तेथे सीता : माणिक वर्मा
१८) थांब सुमंता,थांबवि रे रथ : समूह गान
१९) जय गंगे,जय भागिरथी : समूह गान
२०) या इथे लक्ष्मणा,बांध कुटी : सुधीर फडके
२१) बोलले इतुके मज श्रीराम : गजानन वाटवे
२२) दाटला चोहिकडे अंधार : सुधीर फडके
२३) मात न तूं वैरिणी : वसंतराव देशपांडे
२४) चापबाण घ्या करीं : सुरेश हळदणकर
२५) दैवजात दु:खे भरता : सुधीर फडके
२६ तात गेले ,माय गेली,भरत आता पोरका : वसंतराव देशपांडे
२७) कोण तू कुठला राजकुमार ? : मालती पांडे
२८) सूड घे त्याचा लंकापति : योगिनी जोगळेकर
२९) मज आणुन द्या तो हरिण अयोध्यानाथा : माणिक वर्मा
३०) याचका,थांबु नको दारांत : माणिक वर्मा
३१) कोठे सीता जनकनंदिनी ? :सुधीर फडके
३२) ही तिच्या वेणिंतिल फुले : सुधीर फडके
३३) पळविली रावणें सीता : राम फाटक
३४ ) धन्य मी शबरी श्रीरामा! : मालती पांडे
३५) सन्मित्र राघवाचा सुग्रीव आज झाला : व्ही.एल.इनामदार
३६) वालीवध ना,खलनिर्दालन : सुधीर फडके
३७) असा हा एकच श्रीहनुमान् : वसंतराव देशपांडे
३८ हीच ती रामांची स्वामिनी : व्ही.एल.इनामदार
३९) नको करुंस वल्गना : माणिक वर्मा
४०) मज सांग अवस्था दूता,रघुनाथांची : माणिक वर्मा
४१) पेटवी लंका हनुमंत : प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे
४२) सेतू बांधा रे सागरी : सुधीर फडके,समूह गान
४३) रघुवरा बोलत कां नाही ? : माणिक वर्मा
४४) सुग्रीवा हें साहस असले : सुधीर फडके
४५) रावणास सांग अंगदा : सुधीर फडके
४६) नभा भेदुनी नाद चालले : प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे
४७) लंकेवर काळ कठिण आज पातला : व्ही.एल.इनामदार
४८) आज का निष्फळ होती बाण ? : सुधीर फडके
४९) भूवरी रावण-वध झाला : समूह गान
५०) किति यत्नें मी पुन्हा पाहिली तूंते : सुधीर फडके
५१) लोकसाक्ष शुध्दी झाली :सुधीर फडके
५२) त्रिवार जयजयकार,रामा : समूह गान
५३) प्रभो,मज एकच वर द्यावा : राम फाटक
५४) डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे : माणिक वर्मा
५५) मज सांग लक्ष्मणा,जाउं कुठे ? : लता मंगेशकर
५६) गा बाळांनो, श्रीरामायण :सुधीर फडके

गीतरामायणाचे आजपर्यंत हिंदी, गुजराथी, कन्नड, बंगाली, आसामी भाषा, तेलुगु, मल्याळी, संस्कृत, कोकणी अशा विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे. या सर्व भाषांतरांचे वैशिष्ठ्य म्हणजे भाषांतरकर्त्यांनी एका मात्रेचाही फरक केलेला नाही. ही सर्व भाषांतरे मूळ बाबूजींनी दिलेल्या चालीवरच गायली जातात.

बाबूजींनी स्वतः त्यांच्या आयुष्यात गीतरामायणाचे जवळजवळ १८०० प्रयोग केले. हे प्रयोग त्यांनी देशात तसेच परदेशात केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*