आपण सुरांचे माधुकरी

आपण सुरांचे माधुकरी. वार लाउन गाणी ऐकत फिरणार. जो ऐकवेल उसका भी भला, न ऐकवेल उसका भी भला, या फकिरी वृत्तीने ऐकत फिरत रहायचं. लता मंगेशकर हे परब्रह्म आहे पण गाणाऱ्या सगळ्या कोकिळा आपल्या लाडक्याच आहेत, मग ती सुमन कल्याणपूर असो गीता दत्त असो सुरैया असो आशा भोसले असो किंवा “शमशाद बेगम” असो.

शमशादचा जर कुठला गुण मला आवडला असेल तर तो हा की संगीतकार कोणीही असो ती मुक्तकंठाने, दणक्यात व टिच्चून गायची. तिथे हात राखून काही नाही. चोरटेपणा, नाजूकपणा जरासुद्धा नाही. लतापुढेदेखील दबकणं नाही तिथे औरोंसे क्या डरना. आपल्या ढंगात आपल्या पद्धतीने ठणकावून गाऊन जायचं. जो होगा सो देखा जायेगा. जेष्ठ संगीतकार नौशादजी मागे बोलले होते ‘शमशाद को रेकॉर्डींग रूम के बाहर भी खडा कर के गवा लो तो कोई फरक नही पडनेवाला. वो माइक की आवाज नही थी साहब’. कजरा मुहोब्बत वाला हे गाणं आशा भोसले बरोबर गायली तेव्हा नय्यर साहेब खुष होउन म्हणाले होते ‘साली पचपन साल की बुढढी देखो क्या आशा से टक्कर लेती हैं’. खरंतर अडुसष्ट साली ‘किस्मत’ लागला तेव्हा शमशाद अठ्ठेचाळीस वर्षाची होती पण इथे तो मुद्दा नाही. शमशाद लाहोरची. गाणयाचं शिक्षण अजिबात नाही. आवड होती, आवाज होता. वयाच्या तेराव्या वर्षी तिची पहिली रेकॉर्ड आली. ‘यमला जाट’ या पंजाबी सिनेमात पहिल्यांदा गायली. ‘तकदीर’ या आपल्या चित्रपटात गाण्यासाठी म्हणून मेहबूब खानने त्रेचाळीस साली शमशादला मुंबईत आणली, आणि ती शेवटपर्यंत इथेच राहीली.

काही तुरळक अपवाद वगळता सर्वच संगीतकारांनी तिचा अनुनासिक पण सणसणीत आवाज वापरला. शंकर-जयकिशननी तिला मोजून दोन गाणी दिली. पण गंमत म्हणजे त्यातलही एक गाजलं(एक दो तीन आजा मौसम हैं रंगीन – आवारा). रामचंद्र व नौशाद या दोघांकडे मात्र ती भरपूर गायली. या दोन संगीतकारां शिवाय ओ.पी. नय्यरने तिच्या आवाजाचं चीज केलं. त्याने शमशादला पंधरा सोलो व एकोणीस द्वंद्वगीतं दिली. यातील “कभी आर कभी पार, पूछ मेरा क्या नाम रे, यूॅही बाते न बना तू, थोडासा दिल लगाके देख, मेरी निंदो मे तुम, रेशमी सलवार कुडता जाली का, मै जान गयी तुझे सैय्या, कैसे बजे दिलका सितार, इधर मोहोबत उधर जमाना, ये दुनिया रूप की चोर, धरती को आकाश पुकारे, दुनिया बदल गयी आणिआना मेरी जान” ही गाणी अजरामरच आहेत.

पार्श्वगायनास परवानगी देण्यापूर्वी शमशादच्या कर्मठ बापाने तिला दोन अटी घातल्या होत्या. रेकॉर्डिंगला बुरखा घालून जायचं आणि कुठल्याही परिस्थितीत नूरजहानप्रमाणे तोंडाला रंग फासून कॅमेऱ्यापुढे उभं रहायचं नाही. पहिली अट काळाच्या ओघात वाहुन गेली दुसरी मात्र शमशादने काटेकोरपणे पाळली. वडिलांना आवडणार नाही म्हणून तरुणपणी स्वताचा फोटो देखील काढला नाही. शमशाद दिसते कशी याबद्दल चित्रपटरसिकानां प्रचंड कुतूहल होतं. मात्र शमशाद बेगम म्हटल्यावर डोळ्यांसमोर आपला चेहरा नव्हे तर भन्नाट गाणी उभी रहावीत अशी तिची प्रबळ इच्छा असावी. शमशाद बेगमच्या खुदाने तिची मागणी मंजूर केली आणि रसिकांच्या हृदयात ती कायम रहावी म्हणुन तिला आपल्याबरोबर घेउन गेला

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*