दास डोंगरी राहातो

लेखक : गो. नी. दांडेकर 

हृषीकेशला गंगा वोलांडून यात्रेकरूंचा पोहा बदरीनारायणास चालला. कसे ते गंगा वोलांडणे ! हिमालयाच्या दर्यांमधून तुफान वेगाने खळाळत येणारे भगीरथीचे हिमधवल पाणी. त्यावर नजर ठरेना. चांगले रुंद पात्र. येक खांब पैलतिरी. येक ऐलीकडे. दोन्ही खांबांस रश्श्या बांधिलेल्या. वरच्या दोरास हात देऊन, खालते न पाहता, तोल सांभाळीत, छातीत धडधडत असतां गंगा पार करायची! नवल असे की कित्येक शतकांपासून यात्रेकरू हृषीकेशास गंगा अशीच पार करीत. याहीवेळी त्यांनी ती केलेली स्वामींनी पाहिली. अगदी स्त्रियापुरुषांसुद्धा !

— गो. नी. दांडेकर (दास डोंगरी राहातो)