तंदुरी रोटी

साहित्य: अडीच  ते पावणेतीन कप मैदा, १/२ टिस्पून बेकिंग पावडर, १/२ टिस्पून साखर, ४ टेस्पून दही, ३ टेस्पून तूप, १ टिस्पून मिठ, १/२ कप दुध, १/४ कप तीळ/ कांद्याचे बी, कोथिंबीर.

कृती: दुधामध्ये साखर घालून मिक्स करावे. मैदा, बेकिंग पावडर, दही, तूप, मिठ आणि साखर घातलेले दुध असे मिक्स करावे. लागल्यास थोडे पाणी घालून नेहमीच्या कणकेपेक्षा थोडे सैल पीठ भिजवावे. पीठ चांगले तिंबून घ्यावे. १/२ ते १ तास पीठ झाकून ठेवावे. पीठाचे साधारण ८ गोळे करावे. १ गोळा घेउन तेलाचा हात लावावा. पोळपाटावर ठेवून हातानेच चेपून रोटी बनवावी. वर तीळ चिकटवावे. तंदूरमध्ये रोटी भाजून घ्यावी. भाजलेली रोटी गरम असतानाच त्यावर बटर किंवा तूप सोडावे. त्यावर कोथिंबीर भुरभुरावी. गरमच सर्व्ह करावे. अशाप्रकारे सर्व रोट्या भाजाव्यात.

टीप:
१) तिळाऐवजी कांद्याचे बी लावावे. त्याने जास्त छान स्वाद येतो.
२) तंदूर नसल्यास तवा गरम करावा. रोटीच्या एका बाजूस पाण्याचा हात लावावा आणि तव्यावपाण्याची बाजू तव्यावर हलकेच चिकटवावी. तवा उपडा धरून थेट आचेवर रोटी शेकावी. रोटी शेकली गेली की तव्यापासून मोकळी होईल. तसे न झाल्यास पापड तळायच्या चिमट्याने उकटावी.
३) अर्धी कणिक आणि अर्धा मैदा वापरून किंवा पूर्ण कणकेच्या रोट्यासुद्धा करू शकतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*