आजचा विषय दिवाळीच्या फराळामधील लोकप्रिय प्रकार शेव

दिवाळीच्या फराळामधील एक लोकप्रिय खाद्यप्रकार म्हणजे शेव. आपण वर्षभर मिठाईच्या दुकानातून शेव आणत असतो. खमंग आणि चवीला तिखट असलेली शेव नुसतीही खाता येते किंवा पोहे, उपम्यावर पेरूनही खाल्ली जाते. पण दिवाळीच्या फराळात घरी केलेल्या शेवची चव काही वेगळीच असते. गाठी शेव, बारीक शेव, लसूण शेव अशा विविध प्रकारांमध्ये शेव करता येते.

शेव खमंग व कुरकुरीत होण्यासाठी काही टिप्स
बेसन पीठ ताजे व बारीक चाळणीने चाळून घेतलेले असावे.
शेवेत घालायचे मसाले बारीक चाळणीने चाळून घालावेत. पीठही दोनदा चाळून घ्यावे, म्हणजे शेव हलकी होते.
शेवेचे पीठ जास्त घट्ट किंवा फार पातळ असू नये. पीठ घट्ट असल्यास शेव पाडायला त्रास होतो आणि फार पातळ असल्यास पिठाच्या गुठळ्या होतात.
शेव तळण्यासाठी कढईत भरपूर तेल घ्यावे आणि ते कडकडीत तापवावे.
तळताना शेवेचा रंग हलका पिवळा किंवा केशरी असावा. शेव चवीला खुसखुशीत असावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

आज शेवेचे काही वेगळे प्रकार.
साधी शेव
साहित्य:- २ वाटी बेसन, १ टी स्पून लाल तिखट, १/२ टी स्पून हळद, मीठ, हिंग चवीप्रमाणे, २ टी. स्पून ओव्याची पूड, मोहनासाठी १ टेबलस्पून तेल, तळण्यासाठी तेल.
कृती:- ओव्याची पूड मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यावी. डाळीच्या पिठात तिखट, हिंग, मीठ व गरम तेलाचे मोहन घालून मिश्रण मिसळावे. ओवा पावडरीत थोडे पाणी घालून ते पाणी पिठात मिसळावे आणि पीठ कणकेसारखे भिजवावे. एक गोळा घेऊन तो शेवपात्रात घालावा. कढईत तेल तापवून त्यात शेव पाडावी. ही शेव तापलेल्या तेलातच तळावी. शेव पाडताना गॅस बारीक करावा. नंतर मध्यम आचेवर कुरकुरीत शेव तळावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

जयपुरी शेव
साहित्य:- १ वाटी मैदा, २ वाट्या डाळीचे पीठ,२ मध्यम बटाटे,चवीनुसार मीठ,लाल मिरचीचे तिखट.एक छोटा चमचा जिरेपूड,तळणीसाठी गरजेनुसार तेल.
कृती:- मैदा व डाळीचे पीठ एकत्र करा. एका कपड्यात त्याची सैलसर पुरचुंडी बांधा.नंतर साध्या कुकरमध्ये किंवा प्रेशर कुकरमध्ये चाळणीवर ठेवून वाफवून घ्या. साध्या कुकरमध्ये अर्धा तास ठेवा. प्रेशर कुकरमध्ये दोन शिट्या झाल्या की उतरवा. बटाटे उकदुण घ्या. उकडलेले बटाटे नंतर सोलून व किसून घ्या.पुरचुंडीतील पीठ हाताने सारखे करा. गुटळ्या झाल्यासारखे वाटल्यास एकदा मिक्सरमधून काढा व चाळून घ्या. त्यात किसलेले बटाटे, तिखट मीठ, व जिरेपूड घाला व चांगले मळून घ्या.सोर्यानला तेलाचा हात फिरवून शेवेची बारीक जाळी घालून त्यात बेताचा गोळा घालून शेव काढून सोनेरी रंगावार तळा. फार लाल रंगावर तळू नये.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

कांदा शेव
साहित्य : २ वाट्या बेसन, १ वाटी किसलेल्या कांद्याचे पाणी, हळद, तिखट, मीठ चवीनुसार, १/४ वाटी गरम तेलाचे मोहन, हिंगपूड, तळण्यासाठी तेल.
कृती : डाळीच्या पिठात तिखट, मीठ, हळद व हिंग घालावे. तेलाचे मोहन व कांद्याचे पाणी घालून पीठ भिजवावे. नंतर शेवपात्रातून शेव पाडून गरम तेलात तळावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

लसूण शेव
साहित्य :- वाटीभर तेल, तिखट आवडीप्रमाणे (साधारणपणे छोटे चमचे चार), हळद एक छोटा चमचा, मीठ तीन ते चार चमचे, साधारण मध्यम आकाराचा लसणीचा गड्डा पूर्ण सोलून, डाळीचे पीठ एकदम बारीक दळलेले चार वाट्या, तळण्याकरता तेल.
कृती :- तेल आणि तेवढेच पाणी घेऊन चमच्याने एकत्र करावे. अगदी व्यवस्थित घुसळावे. त्यात चवीप्रमाणे हळद, तिखट व मीठ घालावे. सोललेली लसूण मिक्सरला बारीक वाटून घ्यावी व नंतर ती पाण्यात एकत्र करावी, तेच पाणी गाळून वरील मिश्रणात एकत्र करावे. वरील पाण्यात डाळीचे पीठ घालावे. आता शेव तळण्यासाठी एका कढईत तेल तापण्यास ठेवावे. तयार केलेले पीठ शेवेच्या सो-यात घालावे व तेल कडकडीत तापले की त्यात शेव गाळावी.शेव तळताना ती थेट कढईत गाळावी लागते, चकली सारखी अगोदर तयार करून मग तळणीत घालायची नाही. शेव मंद आंचेवर तळावी, नाहीतर आतून कच्ची राहू शकते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

पालक शेव
साहित्य:- ३ वाट्या चिरलेला पालक, १ टी स्पून जिरेपूड, ५ टी स्पून हिरव्या मिरचीचे वाटण, चवीनुसार मीठ, ५ ते ६ वाट्या बेसन, तळण्यासाठी तेल.
कृती:- चिरलेला पालक स्वच्छ धुवून, वाफवून घ्यावा. नंतर तो मिक्स रमध्ये घालून त्याची पेस्ट करावी. हिरव्या मिरचीचे वाटण, जिरेपूड, मीठ घालून मिश्रण एकत्र करावे. त्यात मावेल एवढे पीठ घालून मिश्रण घट्ट मळून घ्यावे. शेवपात्रात घालून गरम तेलात तळावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

तांदळाची शेव
साहित्य:- २०० ग्रॅम तांदूळ, ५० ग्रॅम चण्याची डाळ, २ टेबलस्पून लोणी, १ टी स्पून जिरेपूड, १ टी स्पून मिरपूड, तळण्यासाठी तेल.
कृती:- तांदूळ व डाळ एकत्र करून गिरणीतून दळून आणावे. पिठात सर्व साहित्य मिसळून पीठ घट्ट भिजवावे. शेवपात्रातून शेव पाडून गरम तेलात तळावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

पुदीना शेव
साहित्य:- २५० ग्रॅम बेसनपीठ, २ वाट्या पुदीना, १ टी स्पून जिरेपूड, १/२ टीस्पून लवंगपूड, १ टीस्पून ओवापूड, चवीनुसार तिखट व मीठ, १ टेबलस्पून गरम तेलाचे मोहन, तळण्यासाठी तेल.
कृती : बेसनात मीठ, तिखट, जिरेपूड, लवंगपूड, ओवापूड घालून पीठ चाळून घ्यावे. पुदिना पाने स्वच्छ धुवून मिक्ससरमधून वाटून घ्यावीत आणि पिठात मिसळावीत. पिठात मोहन घालावे आणि कोमट पाण्यात पीठ भिजवून अर्धा तास झाकून ठेवावे. नंतर शेवपात्रातून गरम तेलात शेव पाडावी व कुरकुरीत तळून घ्यावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

मसाला शेव
साहित्य:- ४ वाट्या बेसनपीठ, ४ टेबलस्पून मोहनासाठी तेल, प्रत्येकी १ टी स्पून लवंगा, जिरे, ओवापूड, तिखट, मीठ, चिमूटभर पापडखार, तळण्यासाठी तेल.
कृती : पिठात सर्व साहित्य घालून, गरम तेलाचे मोहन घालून पीठ भिजवावे व तासभर झाकून ठेवावे. कढईत तेल गरम करून शेवपात्राला शेवेची जाड चकती लावावी व शेव पाडावी. गरम तेलात शेव कुरकुरीत तळावी. ही शेव जास्त खुसखुशीत होते. ही शेव शेवभाजीसाठीही वापरता येईल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

ग्रीन शेव
साहित्य:- १ वाटी भिजवलेले हिरवे चणे, सव्वा ते दीड वाटी बेसनपीठ, चवीनुसार मीठ,२ टीस्पून हिरव्या मिरचीचे वाटण, २ टी स्पून लसूण वाटण, १ टी स्पून ओवापूड, तेल.
कृती : हिरवे चण्यांमध्ये १/४ वाटी पाणी घालून मिक्सदरमधून काढावे. कढईत बारीक केलेले मिश्रण घट्ट शिजवून घ्यावे. तयार झालेले मिश्रण थंड करून त्यात बेसनपीठ, हिरव्या मिरचीचे वाटण, लसूण पेस्ट, मीठ, ओवापूड घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. हवे असल्यास पाण्याचा हात लावून मिश्रण मळून घ्यावे. हे पीठ शेवपात्रात घालून गरम तेलात शेव तळून घ्यावी.
टीप:- आवडत असल्यास यामध्ये पुदिना व कोथिंबिरीचे वाटणही घालू शकता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

गाठी शेव
साहित्य:- १/४ किलो फरसाण पीठ (हे पीठ बाजारात तयार मिळते), १/२ टी स्पून ओव्याची जाडसर पूड, ३ टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन, १/२ टी स्पून पापडखार, मीठ, तेल, तळण्यासाठी तेल.
कृती:- थोडे पाणी घेऊन त्यात पापडखार विरघळवून घ्यावा. नंतर त्यात सर्व साहित्य मिसळून पीठ भिजवावे. शेवेचा झारा बाजारात मिळतो. तो कढईवर ठेवून त्यावर पीठ घालून गरम तेलात शेव पाडावी व कुरकुरीत तळून घ्यावी किंवा सोऱ्याला जाड शेवेची ताटली लावून त्यातून गाठी शेव करता येईल. सोऱ्याने केलेली गाठी शेव जाडीला कमी असते.

गोड शेव
दिवाळी फराळ साठी एक वेगळा पदार्थ. ही शेव बनवतांना जरा जाड भोकाची चाकी वापरावी त्यामुळे त्यावर साखरेचा पाक शेवेवर छान बसतो व कुरकुरीत रहाते.
साहित्य:- शेव करण्यासाठी:- २ कप बेसन, १ कप तांदळाचे पीठ, १/४ कप बटर, १ टे स्पून तेल (गरम), मीठ चवीप्रमाणे, तेल शेव तळण्यासाठी.
साखरेचा पाक करण्यासाठी:- २ कप साखर, १ कप पाणी, २ टी स्पून वेलचीपूड.
कृती:- शेव बनवण्यासाठी:- प्रथम बेसन, तांदळाचे पीठ व मीठ चाळून घ्या. मग त्यामध्ये कडकडीत तेलाचे मोहन व बटर घालून मिक्स करून घेऊन थोडे-थोडे पाणी लागेल तसे वापरून शेवेचे पीठ भिजवून घ्या. कढईमधे तेल गरम करून घ्या. शेवेच्या साचामध्ये पीठ भरून थोडे मोठे भोक असलेली चाकी लावा व कडकडीत तेलामध्ये शेव घाला. शेव घालतांना विस्तव मोठा ठेवा व शेव घालून उलट करून मंद विस्तवावर सोनेरी रंगावर शेव तळून घ्या. शेव तळल्यावर पेपरवर काढा म्हणजे जास्तीचे तेल निघून जाईन. अश्या प्रकारे शेव बनवून घ्या.
पाक बनवण्यासाठी:- मोठ्या कढईमधे साखर व पाणी मिक्स करून घट्ट पाक करून घ्या, मग त्यामध्ये केलेली शेव घालून हळूवारपणे हलवत रहा. थंड झाल्यावर शेवेला एक प्रकारची छान चकाकी येईल.
शेव थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on आजचा विषय दिवाळीच्या फराळामधील लोकप्रिय प्रकार शेव

  1. तिखट शेव करताना तेलाला खूप फेस येतो याचे कारण कळेल का. पिठात मी लावंगिमिरची पावडर, बेडगी मिरची पावडर,ओवा, तेलाचे मोहन हे असते.

Leave a Reply

Your email address will not be published.


*