निळ्या रंगाचे पदार्थ

निळा रंग आहेच सगळ्यांचा आवडता. निळा रंग म्हणजे वर पसरलेले आकाश व ७१ टक्के पाण्याने व्यापलेली ही भूमी. दोन्हीही निळेच. निसर्गात सर्वात जास्त या रंगाची उधळण केलेली आढळते. शीतल गटात मोडणारा हा रंग मनाला आणि शरीराला शांत व प्रसन्न करतो. त्यामुळे हा रंग झोपायच्या, विश्रांतीच्या खोलीत लावणे एकदम योग्य. या रंगात प्रामाणिकपणा आहे, त्यामुळे या रंगाचे कपडे घातलेली व्यक्ती किंवा निळ्या रंगाने सजवलेले घर हे आपलेसे, विश्वासार्ह वाटते. हा रंग आदर्श म्हणून गणला जातो. इथे लांडीलबाडीला वाव नसतो. म्हणूनच प्रथमदर्शनी ठसा उमटवण्यासाठी बऱ्याच कंपन्यांचे लोगो हे निळ्या रंगात असतात. जेणेकरून ‘आम्ही विश्वासू आहोत’ हा संदेश आपोआप पसरवला जातो. निळ्या रंगाच्या या गुणांमुळेच शेअर बाजारात, किमती व खात्रीशीर शेअर्सना ब्लू चिप शेअर्स म्हणतात. त्याचप्रमाणे ब्लू ब्लड म्हणजे खानदानी, थोर परंपरा जपणारा वारस.

हिंदू धर्मातसुद्धा निळ्या रंगाला खूप महत्त्व आहे. आपल्या बऱ्याच हिंदू देवांची चित्रे निळ्या रंगाचा वापर करून काढलेली आढळतात. जसे राम, कृष्ण, विष्णू, शंकर वगैरे.

निळा रंग उत्तम संवादासाठी, विचारांच्या देवाण-घेवाणीसाठी खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतो. हा रंग तुमचे मन मोकळे तर करतोच पण विचारांमध्ये-बोलण्यामध्ये सुसूत्रतापण आणतो. या रंगामुळे समोरच्या माणसाला आपले विचार पटवायला मदत होते. म्हणूनच या रंगाची टॅगलाईन आहे, ‘आय स्पीक, आय अॅ म हर्ड’. तर असा हा शांत, प्रामाणिक, मनाला प्रसन्न करणारा निळा रंग. पण निळ्या रंगाची एक गंमत म्हणजे, या रंगाच्या सान्निध्यात आपल्याला भूक कमी लागते. कधीतरी एकदा ऐकले होते की आहारतज्ज्ञ निळ्या रंगाच्या बाऊलमध्ये खायला सांगतात. निसर्गात निर्माण झालेले किंवा आपण तयार केलेले खाद्यपदार्थ आठवून बघा, एकतरी निळा पदार्थ आहे का? ब्लूबेरीजपण निळ्या नसून गडद जांभळ्या रंगाच्या असतात. याच कारणासाठी स्वयंपाक घरात व जेवणाच्या खोलीत शक्यतो निळा रंग टाळावा.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

ब्लू व्हेन्ड चीज
युरोपीय देशांमध्ये चीज हा त्यांच्या आहाराचा अविभाज्य भाग आहे आणि त्याचा स्वयंपाकात वापरही भरपूर होतो. चीजचा स्वतंत्र कोर्स असतो. जेवणानंतर गोड खायच्या ऐवजी लोक चीज खाणं पसंत करतात. कोर्स म्हणून खाल्लं जाणारं चीज प्रोसेस्ड नसून हाताने बनवलेलं असतं. या चीजमध्ये चक्क हिरव्या/ निळ्या रंगाची बुरशी असते! आणि ते खायला बऱ्यापैकी महाग ही असते. ही बुरशी ‘पेनिसिलियम’ जातीची असून, जगात पेनिसिलिन हे औषध म्हणून यायच्या आधीपासून युरोपीय लोक हे चीज खाऊ न आपली तब्येत राखत होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

ब्लू लगून मॉकटेल
साहित्य: २ टेस्पून लिंबाचा रस, दिड टेस्पून साखर (साखरेचा सिरप),१ टीस्पून आल्याचा रस. १/२ चमचा खाण्याचा निळा रंग. बर्फाचे ६ ते ८ तुकडे, व सोडा.
कृती: लिंबाचा रस, साखरेचा सिरप, आल्याचा रस, निळा रंग आणि बर्फ मिक्सरमध्ये, पूर्ण फिरवून घ्या. पूर्ण क्रश करुन नये. एका सुंदर काचेच्या ग्लास मध्ये हे मिश्रण काढा व त्यात सोडा टाकून ते थंड, ब्लू लगून मॉकटेल पिण्यास द्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

ब्लू कुरास्सो मॉकटेल
साहित्यः- ब्लू कुरास्सो : ३० मि.ली. (दोन टे.स्पू.), १५ मि.ली.लिंबाचा रस, सेवन अप / स्प्राईट, अर्धे लिंबू, ४-५ पुदिना पाने, एक चिमूट मीठ आणि साखर, बर्फाचे खडे
सजावटीसाठी लिंबाची चकती.
कृती:- शेकरमधे कुरासो, लिंबूरस, लिंबाची छोटी फोड, मीठ, साखर, पुदिना घालून ठेचून घ्या (मडल असे विंग्रजीत म्हणतात), नंतर बर्फाचे खडे घालून सर्व रसायन चांगले हलवून मिक्स करा. लोंग स्टेम ग्लासमधे हे मिश्रण घालून वरून सेवन अप किंवा स्प्राईटने टॉप-अप करा. पाहिजे तर वरून बर्फाचा खडा घाला. ग्लासला लिंबाची चकती लावून सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*