आजचा विषय आवळा भाग एक

भारतीय संस्कृतीत वृक्ष,वनस्पतींना अतिशय मानाचे स्थान दिलेले आढळते. वृक्षांचे संवर्धन, पालनपोषण, इतकेच नाही, तर त्यांचे पूजन करण्याचीही पद्धत आपल्या संस्कृतीत आहे. तसेच कार्तिक महिन्यात एकादशी ते पौर्णिमेच्या काळात आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. पूजा झाल्यावर आवळ्याचा औषधासाठी वापर करण्यास प्रारंभ करायचा असतो. आवळा हे फळ गुणवत्तेमध्ये सर्व फळांमध्ये श्रेष्ठ आहे. आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी आवळ्याचा आहार आणि औषधी द्रव्य म्हणून उपयोग करता येतो. आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतं. आयुर्वेदामध्ये आवळ्याला अत्यंत श्रेष्ठ मानलं आहे. हिंदी मध्ये आँवला, संस्कृतमध्ये आमलकी, इंग्रजीमध्ये ‘एम्ब्लिका मायरोबेलान’ या नावाने परिचित आहे. आवळा पोषणाचं काम करतो. म्हणून आयुर्वेदात त्याला धात्री असंही म्हणतात. वार्धक्य अवस्था टाळून चिरतरुण राहण्यासाठी मदत करतो. म्हणून त्याला वयस्थाही म्हटले जाते. चरकाचार्य, वाग्भट, सुश्रूत या सर्व श्रेष्ठ ऋषींनी औषधामध्ये आवळ्याचा वापर करावयास सांगितलं आहे. आवळ्याचे पांढरे आवळे व रान आवळे असे दोन प्रमुख प्रकार आहेत. सुकलेल्या आवळ्यापेक्षा हिरवा ताजा आवळा आधिक गुणकारी असतो. आवळ्याचा छुंदा, मुरंबा, लोणचे, चटणी, अवलेह, कँडी, सरबत, सुपारी करून वर्षभर आवळा सेवन करता येतो. आवळा रक्तदोषहारक, पित्तशामक, सारक व रुचकर आहे. आवळा हा आम्लमधुर रसाचा, शीतवीर्यात्मक व मधुर विपाकी असल्यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करतो. यामध्ये शोधनाचा गुण असल्याने रक्तात साचलेली विषद्रव्ये दूर करून रक्त शुद्ध करतो. अशाच प्रकारे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र या सप्तधातूंमध्ये जाऊन प्रत्येक धातूतील विषद्रव्ये दूर करून सर्वच धातूंना शुद्ध बनवतो. या त्याच्या गुणांमुळेच शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणूनच नियमितपणे आवळा सेवन करणे आवश्यक आहे. औषधात आवळ्याचे फळ, पाने आणि बिया वापरल्या जातात. आवळा पोटात घेतला जातो, तसेच शरीराला बाहेरून लावण्यासाठीसुद्धा वापरला जातो. वाळवलेल्या आवळ्यांचाही औषधात वापर करता येतो. मात्र च्यवनप्राशसारखे रसायन बनवताना किंवा ज्या ठिकाणी आवळ्याचा रस वापरायला सांगितला आहे आवळकाठी म्हणजे वाळवून ठेवलेले आवळे. आवळा हा औषधात वापरला जातोच, पण तो स्वयंपाकातही महत्त्वाचा असतो. “अम्लफलेषु श्रेयम्‌’ म्हणजे सर्व आंबट फळांमध्ये आवळा श्रेष्ठ सांगितला असल्याने चटणी, लोणचे, सुपारी करण्यासाठी आवळ्यासारखे दुसरे उत्तम फळ नाही. मोरावळा तर सर्वांच्याच परिचयाचा असतो. खरं तर आम्लधर्मी पदार्थाने पित्ताची वृद्धी होते, परंतु आवळा आम्लधर्मी असला तरी त्याचा विपाक मधुर असल्यामुळे त्याच्या मधुर व शीतल गुणांमुळे त्याच्या सेवनाने पित्त वृद्धी न होता पित्तप्रकोप कमी होतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

आवळा मुरंबा
साहित्य:- २ किलो आवळे, २ किलो साखर, २० ग्रा. चुना, १० ग्रा. छोटी वेलची, १० ग्रा. चांदीचा वर्क
१ ग्रा. केसर, पाणी आवश्यकतेनुसार
कृती:- आवळ्यास जाड दाभणाने टोचून घ्यावे. चुन्याचे तीन भाग करावे. एक भाग चुना पाण्यात मिळवावे आणि आवळ्यास त्यात टाकावे. ४ तासानंतर आवळ्यास चुन्याच्या पाण्यातुन काढुन ते पाणी फेकुन द्यावे आणि दुसरा भाग चुना पाण्यात टाकुन आवळे २४ तास भिजवावे नंतर याच प्रमाणे तिसरा भाग चुना पाण्यात टाकुन साखरेचा एका तारेचा पाक तयार करावा. केसर व छोटी वेलची वाटुन त्यात मिसळावी व आवळे त्यात टाकावे. थंड झाल्यावर बरणीत भरून ठेवावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

आवळ्याचा मोरावळा
साहित्य:- मध्यम आकाराचे चांगले रसरशीत डोंगरी आवळे, अर्धा किलो साखर, सहा वेलदोड्यांची पूड, एक मोठा चमचा आल्याचा रस.
कृती:- आवळे धुऊन पुसून त्यांना खूप टोचे मारावेत व ते चांगले वाफवून घ्यावेत. मग साखरेचा एक तारी पाक करून त्यात आवळे घालावेत. मग पातेले खाली उतरवून तसेच झाकून ठेवावे. दुसऱ्या दिवशी पुन्हा मंद आचेवर पातेले ठेवून दोन-चार उकळ्या आणाव्यात. दोन तारी पाक झाला, की पहिल्याप्रमाणे झाकून ठेवावे. तिसऱ्या दिवशी एक-दोन उकळ्या आणाव्यात. पातेले खाली उतरवून अर्धवट झाकून ठेवावे. गार झाल्यावर त्यात वेलची पूड घालून ढवळून चविष्ट मोरावळा बरणीत भरावा व झाकण घट्ट लावावे.
संजीव वेलणकर पुणे.
पुणे ९४२२३०१७३३

आवळ्याचे लोणचे
साहित्य:- पाच-सहा रसरशीत डोंगरी आवळे, एक मोठा चमचा मोहरीची कुटलेली डाळ, दोन छोटे चमचे लाल तिखट, दोन छोटे चमचे मीठ, एक छोटा चमचा हळद, एक छोटा चमचा पिठीसाखर व हिंगपूड, चिमटीभर मेथी पूड, पाव वाटी तेल.
कृती:- आवळे वाफेवर उकडून घ्यावेत. त्याच्या पाकळ्या बीपासून वेगळ्या कराव्यात. मग एका तसराळ्यात मोहरी डाळ, तिखट, हिंग पूड, मेथी पूड व हळद एकत्र करून त्यावर गरम कडकडीत तेल घालावे. हा मसाला कालवून गार झाल्यावर त्यात मीठ व साखर घालावी. लोणचे चांगले कालवून सटात ठेवावे.
टीप:- यात 2-3 कमी तिखट हिरव्या मिरच्यांचे तुकडे, थोडे आल्याचे तुकडे घातले तर लोणचे छान लागते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

आवळ्याची चटणी
चांगले मोठेसे, डाग नसलेले आवळे दोन शिट्या करून कुकर मधे उकडून घ्यावेत. बिया व जमतील तितक्या शिरा काढून टाकाव्यात. हाताने नीट कुस्करावेत. मोठ्या किसणीवर किसले तरी चालेल. मग यात चवीप्रमाणे मीठ,तिखट,जिरेपूड व थोडा गूळ किसून मिसळावा. नीट एकजीव करावे. वरून मोहरी, हिंग व हळदीची खमंग फ़ोडणी द्यावी. हिंग नेहेमीपेक्षा किंचित जास्त असावा. पुन्हा नीट एकत्र करावे. ही चटणी आंबटगोड, रुचकर लागते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

आवळा कॅन्डी
साहित्य – १ किलो आवळे, ७५० ग्र. साखर, पीठी साखर
कृती – चांगले निवडलेले आवळे स्वच्छ धुवून, पुसून, पाणी न घालता बंद डब्यात भरावे. आता हा डबा कुकरमध्ये ठेवून ३-४ शिटट्या होऊ द्याव्यात. पूर्णपणे गार झाल्यावर आता आवळ्याच्या पाकळ्या सहजपणे वेगळ्या करता येतील. बी काढून टाकून सर्व आवळ्यांच्या पाकळ्या वेगळ्या करुन घ्याव्या. हे आवळे भांडयात काढून त्यावर साखर पेरावी अश्या त-हेने आवळे पूर्णपणे साखरेने झाकले जातील. आता हे भांडे उन्हात ठेवावे. आठ तासांनी साखरेचा पूर्णपणे पाक झाला असेल. हे भांडे पुढील दोन दिवस उन्हातच राहू द्यावेत. तिस-या दिवशी आवळे पूर्णपणे पाकाच्या तळाशी जातील. आता चाळणीवर हा पाक गाळून घ्यावा. वर उरलेल्या कॅन्डी उन्हात अजून २-३ दिवस वाळवायला ठेवाव्यात. पूर्णपणे वाळल्यावर अधिक गोड हवी असल्यास कॅन्डीवर पिठी साखर चोळावी. वाळलेल्या कॅन्डी बंद डब्यात भराव्यात. उरलेला पाक हा आवळा सरबत म्हणून उपयोगात आणता येतो. पाक बाटलीत भरुन, फ्रीज मध्ये ठेवावा. सरबत प्यायच्या वेळेला एक ग्लास पाण्यात २-३ चम्मचे पाक मिसळल्यास आवळा सरबत तयार.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

आवळा सरबत
साहित्य:- ताज्या आवळ्याचा एक भांड भरून रस, एक मोठा चमचा आल्याचा रस, थोडे शेंदेलोण व पादेलोण, आवळा रसाच्या चौपट साखर.
कृती:- साखरेचा दोन तारी पाक करावा व तो गार झाला की त्यात आवळा रस, दोन्ही मिठे व आल्याचा रस घालून हे मिश्रण ढवळून चांगले एकजीव करावे व बरणीत भरून ठेवावे. हे सरबत प्यायला घेताना एक मोठा चमचा सिरप घेऊन त्यात आवडीप्रमाणे थंडगार पाणी घालून ढवळून प्यावे. मधुर लागते.
संजीव वेलणकर पुणे.
पुणे ९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on आजचा विषय आवळा भाग एक

Leave a Reply

Your email address will not be published.


*