हिवाळ्यात काय खाल?

मस्त सुखद थंडी पडली आहे, थंडीमुळे खवळणारी भूक आणि डोळ्यांसमोर सुंदर भाज्या आणि फळांचे ढीग! छान छान, चविष्ट पदार्थ बनवायला अजून काय कारण हवं? खरंच बाजारात ताज्या ताज्या भाज्यांचे आणि फळांचे ढीग पाहून छान काहीतरी बनवावंसं वाटतं ना? ताजे मटार, केशरी लाल गाजरं, पांढरा शुभ्र फ्लॉवर, हिरव्या तरतरीत रंगाच्या पालेभाज्या, कोथिंबिरीच्या जुड्या, फ्रेश रंगांची उधळण करणारी डाळिंब, संत्री, लहानपण जागवणारी बोर, पेरू… व्वा क्या बात है! चला या छानशा ऋतूत चविष्ट आणि हेल्दी रेसिपीज खाऊन तंदुरुस्त राहू या. थंडीच्या दिवसात तशीही भूक लागतेच. त्यातच तंदुरुस्त होण्याचं खूपच मनावर घेऊन जिम, फिरायला जाणं किंवा इतर काही व्यायाम सुरू केला असेल तर भूक अगदी खवळलेलीच असणार. तेव्हा नाश्ताच भरपेट करायला हवा. थंडीच्या दिवसांत काहीही खाल्लेलं पचतं. या दिवसात एरवी कमी खावेत असे तूप, साय वगैरे पदार्थही भरपूर खाल्लेले चालतात. याशिवाय शरीरात उष्णता, बल वाढवणारे तीळ, लोणी, बाजरी, उडीद, गूळ, मोसमी भाज्या आणि फळे, अंडी, चिकन, मटन हे पदार्थ थंडीत आवर्जून खायला हवेत. बाजरीची तीळ लावलेली भाकरी, लोण्याचा गोळा, तिळाची चटणी, लेकुरवाळी भाजी, खिचडी हा आपला पारंपरिक थंडीतला मेनू होता. अजूनही कित्येक ठिकाणी थंडीत या मेनूची मजा चाखली जाते.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

खास थंडीत खावेत असे काही पदार्थ
साय- रवा उत्तप्पा
साहित्य :- १ वाटी बारीक रवा, १ वाटी साय किंवा सायीचं दही, प्रत्येकी दोन टे.स्पू. बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो, एकत्रित अर्धी वाटी बारीक चिरलेल्या किंवा किसलेल्या मिक्स भाज्या- फ्लॉवर, पत्ताकोबी, फ्रेंच बिन्स, २/३ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ, बॅटर पातळ करण्यासाठी लागेल तसे ताक किंवा पाणी, तेल, तूप किंवा बटर.
कृती :- रवा, साईचं दही, मीठ आणि ताक घालून सरसरीत बॅटर बनवा. वेळ असेल तर १५-२० मिनिटे झाकून ठेवा. नाही तर लगेच त्यात सगळ्या भाज्या घाला. नीट मिक्सा करून नेहमीसारखे उत्तप्पे घाला. (भाज्या पिठात मिक्सर न करता पिठाचा उत्तप्पा घालून वरूनही भाज्या पेरता येतील) झाकण घाला. तेल सोडून उलटवा. खमंग झाल्यावर थोडं तेल सोडून कोणत्याही चटणीबरोबर खायला द्या. असे एक- दोन उत्तप्पे खाल्ले तर थंडीतही दुपारच्या जेवणापर्यंत भूक लागणार नाही.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

बाजरी- मटार मुटकुळे
साहित्य :- १ वाटी बाजरीचे पीठ, १ वाटी मटार दाणे, १/२ वाटी बेसन, १ टे.स्पू. आलं- लसूण पेस्ट, १ टे.स्पू. मिरची पेस्ट, कोथिंबीर, १ टे.स्पू. प्रत्येकी ओवा, लाल तिखट, धने पावडर, १ टे.स्पू. भाजलेले तीळ, मीठ, किंचित साखर, चिमूटभर सोडा, तेल, फोडणीचे साहित्य.
कृती :- मटार थोडेसे वाफवून घ्या. तेल आणि फोडणीचं साहित्य सोडून सगळे साहित्य मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून गोळा मळा. (सोडा घालणार नसाल तर १ टे.स्पू. गरम तेलाचं मोहन घाला). या पिठाचे अलगद हाताने मुटकुळे वळा. तळणार असाल तर लगेच हे मुटकुळे तळता येतील. तळण नको असेल तर मुटकुळे वाफवून घ्या. थोड्या तेलाची खमंग फोडणी करून त्यात मुटकुळे परतून घ्या. नुसते किंवा सॉसबरोबर खायला द्या.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

क्रंची एगप्लांट (वांगे)
साहित्य :- भरताची मध्यम आकाराची २ वांगी, प्रत्येकी २ टे.स्पू. बारीक चिरलेल्या भाज्या- गाजर, बीट, बटाटा, फ्रेंच बिन्स, फ्लॉवर, स्वीट कॉर्न, पनीर यांपैकी कोणत्याही भाज्या कोथिंबीर, मीठ- मिरपूड, १ टे.स्पू. ठेचलेले लसूण, २-३ टे.स्पू. ब्रेडक्रम्स, २ चीज क्यूीब्ज, २ टे.स्पू. तेल, प्रत्येकी १ टे.स्पू. लाल तिखट, जिरे पावडर, धने पावडर, 1 टे.स्पू. भाजलेले तेल.
कृती :- वांग्याचे साधारण पाव इंच जाडीचे स्लाईस करून घ्या. तिखट, मीठ, धने आणि जिरे पावडर एकत्र करून वांग्याच्या कापांना चोळून लावा. झाकून ठेवा. सगळ्या भाज्या मऊ वाफवून थोड्या ठेचून घ्या. त्यात मीठ, मिरपूड, अर्ध किसलेलं चीज, तीळ, लसूण आणि कोथिंबीर घाला. चांगलं मिक्स. करा. ओव्हनच्या ट्रेला तेलाचा हलका हात फिरवून घ्या. त्यावर वांग्यांच्या स्लाइस ऍरेंज करा. प्रत्येक स्लाइसवर भाज्यांचं मिश्रण पसरवा. वरून चीज आणि ब्रेडक्रम्स मिक्सट करून पसरवा. यातसुद्धा तीळ छान लागतात. बाजूनी थोडं थोडं तेल सोडा. १८० अंश वर १५ते २० मिनिटापर्यंत बेक करा. ओव्हन नसेल तर स्लाईसला तेल लावून एका बाजूने तेलावर भाजून घ्या. खमंग बाजू वर करून त्यावर भाज्या पसरवा आणि तेल सोडून बारीक गॅसवर खमंग होऊ द्या.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

झटपट पालक वडी
साहित्य :- पालकची २० मोठी पाने, १/२ वाटी बेसन, १/२ वाटी थालीपिठाची भाजणी, १ टे.स्पू. तीळ, कोथिंबीर, मीठ, लाल तिखट, १ टे.स्पू. आलं- मिरची पेस्ट, तेल, फोडणीचं साहित्य.
कृती :- बेसन, भाजणी, तीळ, तिखट, मीठ, आलं-मिरची पेस्ट, कोथिंबीर हे सगळं साहित्य एकत्र करून पाणी घालून पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट सहज पसरवण्याइतकी, तर रोल वळला जाईल इतपत घट्ट/ पातळ असावी. प्रत्येक पानावर ही पेस्ट लावून रोल वळा. पसरट वाडग्यात ठेवून वाफवून घ्या. डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करा. किंवा खमंग फोडणी करून त्यात परतवून घ्या. बेसन किंवा भाजणीऐवजी इन्स्टंट ढोकळ्याचं पीठही वापरता येईल. यामुळे वडी आणखी हलकी होईल.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

केळ्याचे गाकर
साहित्य :- १ मोठे केळे, १ वाटी रवाळ कणीक, १ टे.स्पू. तुपाचे मोहन, १/२ टे.स्पू. साखर, किंचित मीठ, दूध लागेल तसे.
कृती :- केळी फोर्कनी मॅश करून घ्या. त्यात मावेल तशी कणीक घाला. गरम तुपाचे मोहन, साखर, मीठ घालून नीट मिक्सड करा. गाकर हलके बिस्किटासारखे व्हायला हवे असतील तर चिमूटभर सोडा घाला. हवे तर दुधाच्या हाताने कणीक भिजवा. अर्धा तास झाकून ठेवा. पुरीपेक्षा किंचित जाड गाकर लाटून तव्यावर दोन्ही बाजूंनी भाजून नंतर डायरेक्टा गॅसवर (फुलक्याासारखे) भाजून घ्या. छान टम्म फुगतात. तूप, चटणी किंवा लोणच्याबरोबर गरम खायला द्या.
महाराष्ट्रात जसे आपण थंडीत आहारात उष्ण पदार्थ घेतो, तसेच पंजाबमध्येही थंडीत उडीद भरपूर वापरले जातात. त्यातही “उडद दाल की पिन्नी’ थंडीत त्यांच्याकडे बनतेच.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*