आजचा विषय पुडिंग भाग दोन

फ्रूट जेली कस्टर्ड पुडिंग
साहित्य : जेलीचे आपल्या आवडीच्या स्वादाचे एक पाकीट, सफरचंद, चिकू, अननस, केळी, द्राक्षे, संत्री वगैरे फळांचे काप २ कप (उपलब्ध फळे), अर्धा लिटर दुधाचे व्हॅनिला इसेन्सचे कस्टर्ड, १०० ग्रॅम क्रीम, सजावटीसाठी ड्रायफ्रूटस्‌, चेरीज (सुक्या चेरीज बाजारात मिळतात.)
कृती : जेलीचे एक पाकीट घेऊन त्यावरील सूचनेप्रमाणे जेली बनवावी व फ्रिजमध्ये अर्धवट सेट झाली की त्यात फळांचे काप मिसळून पुन्हा सेट होण्यास फ्रिजमध्ये ठेवावी. अर्धा लिटर दुधाचे कस्टर्ड बनवून गार करून घ्यावे. सेट झालेल्या जेलीवर या गार कस्टर्डचा थर द्यावा. पुन्हा थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवून नंतर त्यावर क्रीम पसरून घालावे. नंतर सुक्या चेरीज, डाळिंबाचे दाणे, काजू – बदामाचे काप यापैकी कशानेही आवडीप्रमाणे सजावट करावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

ट्रायफल पुडिंग
साहित्य : १ स्पंज केक (८-१० छोटे साधे कप केक्स घेतली तरी चालतील.), ४-५ चमचे कोणत्याही फळाचे जॅम; सफरचंद, केळी, चिकू, द्राक्ष वगैरे फळांचे काप २ कप, १ लिटर दुधाचे व्हॅनिला कस्टर्ड, क्रीम व सजावटीसाठी डाळिंबाचे दाणे, चेरीज, स्ट्रॉबेरीज अथवा आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटस.
कृती : स्पंज केकचे लहान तुकडे करून त्यांना जॅम लावावा. काचेच्या बाऊलमध्ये तळाला प्रथम थोड्या स्पंज केकच्या तुकड्यांचा एक थर ठेवावा. त्यावर तयार केलेल्या कस्टर्डचा एक थर सगळीकडे नीट पसरावा. नंतर फळांचा एक थर, पुन्हा कस्टर्डचा थर, पुन्हा स्पंज केकचा थर, पुन्हा कस्टर्ड, पुन्हा फळे, शेवटी कस्टर्डचा थर द्यावा. फ्रिजमध्ये ठेवून सेट झाल्यावर त्यावर क्रीम पसरावे व आवडीप्रमाणे चेरीज, स्ट्रॉबेरीज वा ड्रायफ्रूटसने सजवावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

ब्रेड ऍपल पुडिंग
साहित्य : ४ सफरचंद, १ ब्रेड (आदल्या दिवशीचा असावा), आवश्याकतेप्रमाणे दूध, लोणी, साखर, दालचिनी पूड, थोडे काजू.
कृती : सफरचंदांची साल काढून फोडी करून घ्याव्यात. ३-४ चमचे साखर घालून शिजवून घ्यावे. जॅमसारखे मिश्रण झाल्यावर त्यात थोडी दालचिनीची पूड घालावी. ब्रेड स्लाईसना लोणी लावून त्यावर साखर भुरभुरावी. पावाचे तुकडे भिजतील इतके दूध घेऊन त्यात ब्रेडज स्लाईसेस भिजवावेत व कुस्करून घ्यावेत. ओव्हनमध्ये ठेवण्यास योग्य अशा “बेकिंग डिश’ला लोण्याचा हात लावून त्यावर उपलब्ध ब्रेडपैकी काही स्लाईसचा थर द्यावा. त्यावर सफरचंदाचा थर, पुन्हा पावाच्या स्लाईसचा थर, पुन्हा सफरचंदाचा थर. शेवटी ब्रेड स्लाईसचा थर द्यावा. त्यावर एकात दोन केलेले काजू ठेवावेत. ओव्हनमध्ये १८० अंश तापमानावर १५ ते २० मिनिटे भाजून घ्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

बिस्कीट-चॉकलेट पुडिंग
साहित्य : आपल्या आवडीची कोणतीही गोड बिस्किटे, ५०० ग्रॅम चॉकलेट पावडर, १२५ ग्रॅम तूप वा लोणी अर्धी वाटी, ५० ग्रॅम पिठीसाखर, आवश्य५कतेप्रमाणे दूध, क्रीम, सुकामेवा.
कृती : चॉकलेट पावडर, तूप वा लोणी व पिठीसाखर एकत्र करून डबल बॉयलरमध्ये ठेवावे. (म्हणजे मोठ्या भांड्यातील आधण पाण्यात हे छोटे भांडे ठेवावे) वितळवून घ्यावे. अशा प्रकारे चॉकलेट सॉस बनवावे. बिस्किटे दुधात भिजवून घ्यावीत. पुडिंग बाऊलमध्ये बिस्किटांचा एक थर, त्यावर चॉकलेट सॉसचा थर, पुन्हा बिस्किटांचा थर, शेवटी पुन्हा चॉकलेट सॉसचा थर असे करावे. फ्रिजमध्ये ठेवावे. शेवटचा थर चॉकलेट सॉसचा असावा. फ्रिजमध्ये ठेवावे. पुडिंग सेट झाल्यावर क्रीम घालून सुकामेव्याने सजवावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

मेक्सिवकन पुडिंग
साहित्य : संत्री, केळी, द्राक्षे, चिकू ही फळे बारीक चिरून २ कप, १२-१५ ग्लुकोज बिस्किटे, ८-१० ब्रेड स्लाईस, अर्धा लिटर दुधाचे व्हॅनिला स्वादाचे कस्टर्ड, क्रीम, लिंबू.
कृती : फळांच्या फोडींना अर्ध्या लिंबाचा रस लावून ठेवावा. कस्टर्ड बनवून घ्यावे. पुडिंग करावयाच्या डिशमध्ये प्रथम थोडे ब्रेड स्लाईस नीट मांडून ठेवावे. त्यावर ५-६ बिस्किटे मोडून घालावीत. त्यावर अर्धे कस्टर्ड ओतावे. मग त्यावर फळांच्या तुकड्यांचा थर ठेवावा. त्यावर उरलेले ब्रेड स्लाईस ठेवून त्यावर उरलेल्या बिस्किटांचा थर द्यावा. त्यावर उरलेले अर्धे कस्टर्ड घालावे. फ्रिजमध्ये दोन तास ठेवून सेट झाल्यावर त्यावर क्रीम घालावे व चेरीज अथवा डाळिंबाच्या दाण्यांनी सजावट करावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*