आजचा विषय पिठलं भाग एक

चाटून पुसून खाण्यासाठी सगळ्यांचं जेवण पूर्ण होण्याची वाट बघत बसणारेही घरोघरी सापडतील. आणि पिठल्यात असं काय आहे हे विचारणाऱ्या माणसाला खवय्यांच्या रसिकतेच्या व्याख्येतून कायमचा बाद करून टाकतील. आणि वर ‘पिठल्यात काय नाही असं विचारा.’ असंही म्हणतील.
खरंच आहे ते. पिठल्यात काय नाही? वेगवेगळ्या पद्धतीने शिजवलेलं डाळीचं पीठ म्हणजे पिठलं नव्हे. भुकेलेल्याला कमी श्रमात, कमी वेळेत क्षुधाशांतीबरोबरच पोट भरल्याचं अपार समाधान देणारा पदार्थ म्हणजे पिठलं. ते करण्याच्या पद्धती मात्र वेगवेगळ्या. कुणी फोडणीमध्ये हिरवी मिरची, लसूण, कांदा कोथिंबीर परतून घालतं, त्यात भरपूर पाणी घालून ते उकळलं की त्यात डाळीच्या पिठाची पेस्ट घातली जाते. आणि मग ते सगळं कढईमध्ये रटरट शिजवलं जातं. या पद्धतीची गंमत म्हणजे अगदी थोडय़ा पिठात बक्कळ पिठलं होऊ शकतं. जितकं पाणी वाढवाल तितकं पिठलं जास्त. तिखटमिठाचं प्रमाणही त्यानुसार वाढवत जायचं. खूप लोक जेवायला असतील तेव्हा हमखास पुरवठय़ाला येणारं. त्यामुळे झुणका-भाकरी विकणाऱ्या हॉटेलवाल्यांचीही ही आवडती पद्धत. पिठल्याच्या दुसऱ्या प्रकारात फोडणी देऊन, त्यात पाणी घालून झालं की ते पाणी उकळायला लागल्यावर त्यात वरून पीठ पेरलं जातं. हे पीठ पेरून केलेलं किंवा गुठळ्यांचं पिठलं. उकळत्या पाण्यात पीठ फिरवल्यामुळे त्यात गुठळ्याही होतात. जसजसं उकळत जाल तशा या गुठळ्या शिजतात आणि एकजीव होतात किंवा वरून गार पाण्याचा हबका मारून त्या फोडल्या जातात. हे पिठलं हिरवी मिरची, लसूण घालून नाही तर लाल तिखट घालून खमंग केलं जातं. ते ढवळत राहायचं. ते भरपूर शिजलं की कढईला खाली चिकटायला लागलं ते झालं असं समजून आणखी पाच मिनिटं मंदाग्नीवर ठेवायचं. वरून हिरवीगार कोथिंबीर पसरायची आणि भात किंवा भाकरीबरोबर गरमगरम खायचं. गरम गरम पिठल्यावर तुपाची धार सोडली तर जिव्हादेवी आणखी तृप्त होणार. असं गरमगरम पिठलं शिळ्या भाकरीबरोबर तर आणखी झक्कास लागतं. वर ते लोखंडाच्या कढईत केलेलं असेल तर क्या बात है..
हे पिठलं करायचे सर्वमान्य प्रकार. पण याशिवाय पिठलं करायचे आणखीही दोन-तीन प्रकार आहेत. एखाद्या माणसापुरतं पिठलं करायचं असेल तर भाकरी केलेल्या तव्यातच फोडणी द्यायची. त्या फोडणीतच डाळीचं पीठ घालायचं ते चांगलं परतून घ्यायचं आणि त्यात वरून पाणी घालून शिजवायचं.
काही समाजांमध्ये डाळीच्या पिठाचा उंडा करून तो चक्क उकडला जातो. मग तो उकडलेला उंडा गार झाला की फोडून मोकळा करून फोडणीत परतला जातो. प्रवासात टिकणारा हा पिठल्याचा प्रकार आहे.
पिठलं खाताना बुक्की मारलेला कांदाच पाहिजे…
कापलेल्या कांद्यात ती मजा नाही…काय…?
गरम गरम पिठलं भाकर, कांदा, लोणचे
म्हंजे “अन्न हे पुर्ण ब्रम्ह”
हो पण पोटात भूक असणं सर्वात महत्वाचं हं…!!!

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

काही कृती पिठल्याची
सुरण पिठलं
साहित्य:- चिंच घालून शिजलेला सुरण पल्प २ वाटी (सालपट काढून), हिरवा पातीचा कांदा चिरलेला १ वाटी, कोथिंबीर अर्धी वाटी, अद्रक, लसूण पेस्ट प्रत्येकी २ चमचे, हिरव्या मिरचीचे तुकडे २ चमचे, धने पूड, तीळ पूड प्रत्येकी २ चमचे, जिरेपूड १ चमचा, तिखट, मीठ, चवीनुसार हळद अर्धा चमचा, आमचूर, साखर प्रत्येकी २ चमचे, तेल १ डाव, फोडणीचे साहित्य.
कृती : गॅसवर कढईत गरम तेलात फोडणी तडतडल्यावर मिरचीचे तुकडे खमंग होऊ द्या. कांदा, पेस्ट परतल्यावर सुरणाचा गोळा तिखट, मीठ, हळद, धनेपूड, तीळपूड, जिरेपूड घालून सुरण खूप परता. नंतर पाणी टाकून आमचूर व साखर घाला. पिठल्यासारखं सुरण खदखद शिजू द्या. शिजल्यावर कोथिंबीर घालून सव्‍‌र्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

दही-दुधाचं पिठलं
साहित्य: १ वाटी डाळीचं पीठ (बेसन), १ वाटी आंबट दही, १ वाटी दूध, १ टेबलस्पून दाण्याचं कूट, २ टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून हळद, मीठ चवीनुसार, १ टेबलस्पून तेल, मोहरी, पाव टीस्पून हिंग
कृती:- प्रथम एका भांड्यात डाळीचं पीठ घेऊन त्यात दही, दूध घालून नीट एकजीव करावं. गुठळ्या राहू देऊ नयेत. आपल्याला पिठलं जितकं पातळ हवं असेल त्या अंदाजानं त्यात पाणी घालावं.
आता त्यात तिखट, मीठ आणि दाण्याचं कूट घालावं. एका कढईत तेल गरम करावं. तेल तापल्यावर त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडली की त्यात हिंग घालावा. नंतर हळद घालावी. फोडणी खमंग झाली पाहिजे. आता त्यात कालवलेलं डाळीचं पीठ घालावं. नीट हलवून घ्यावं आणि मध्यम आचेवर ठेवावं. जरा उकळी आली की गॅस बारीक करावा आणि झाकण घालून ५-७ मिनिटं ठेवावं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

शेवग्याच्या शेंगांचं पिठलं
साहित्य: १ वाटी डाळीचं पीठ (बेसन), २-३ शेवग्याच्या शेंगा (३ इंच लांबीचे तुकडे करून उकडून घ्या, उकडलेलं पाणी त्यातच ठेवा), ६-७ कमी तिखट हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरलेल्या (तिखट असतील तर २-३ घ्या), १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, ३-४ आमसूलं, १ टेबलस्पून तेल, पाव टीस्पून हळद, मोहरी, पाव टीस्पून हिंग, मीठ चवीनुसार
कृती:- एका पातेल्यात डाळीचं पीठ पाणी घालून कालवून घ्या. आपल्याला पिठलं जितपत पातळ हवं असेल त्या प्रमाणात पाणी घाला. त्यातच मीठ आणि आमसूलं घालून ठेवा. एका कढईत तेल चांगलं गरम होऊ द्या. त्यात मोहरी घालून ती तडतडली की हिंग घाला. हळद घालून त्यात मिरची घालून जरासं परता. नंतर त्यातच कोथिंबीर घाला आणि चांगलं परता. नंतर त्यात शेवग्याच्या शेंगा पाण्यासकट घाला. चांगली उकळी येऊ द्या. उकळल्यावर त्यात कालवलेलं पीठ घाला. नीट हलवा आणि मंद आचेवर ७-८ मिनिटं ठेवा. पिठलं तयार आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

कोवळ्या मेथीचे कोरडे तव्यावरचे पिठलं
साहित्य:- एक कोवळी गावरान मेथीची जुडी,चणा डाळीचे पीठ ७-८ चमचे, मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर, ६-७ लसूण पाकळ्यांचे बारीक केलेले तुकडे, ३-४ हिरव्या मिरच्या तुकडे, मीठ चवीनुसार, ७-८ ताजी कढीपत्याची पाने, एक चमचा जिरे भाजून आणि फोडणीचे सामान (३ मोठे चमचे तेल, मोहोरी, हळद, हिंग, जिरे.)
कृती:- प्रथम लसणाच्या पाकळ्यांचे तुकडे, हिरव्या मिरच्याचे तुकडे, भाजलेले जिरे, थोडीशी कोथिंबीर व थोडे मीठ घालून मिक्सरमधून वाटण तयार करून घ्यावे. गॅसवर एका कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, हिंग, हळद, कढीपत्याची पाने व कच्च्या मसाल्याचे वाटण घालून फोडणी करावी त्यात धुवून चिरलेली मेथी घालावी व थोडे मीठ घालून कढईवर झाकण ठेवून गॅस मध्यम आचेवर ठेवून १०-१२ मिनिटे शिजवून घ्यावी. मेथी शिजली की त्यात एका हाताने उलथन्याने हलवत राहून दुसर्याथ हाताने बेसन पीठ लावावे. पिठाच्या गुठळ्या होऊ देऊ नयेत.पिठलं पुरेसे घट्ट झाल्यावर पीठ लावणे थांबवावे व मध्यम आचेवर शिजू द्यावे.वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करावा व ५ मिनिटे कढईवर झाकण ठेवावे. गरम मेथीचे पिठलं (झुणका) भाकरी व हिरव्या मिरच्यांचा खर्डा असे सर्व्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

उपवासाची पिठलं
साहित्य:- एक वाटी दाण्याचा कूट, दोन हिरव्या मिरच्या, कढीपत्ता ४-५ पाने, एक चमचा जिरे, तेल एक चमचा, ताक एक ग्लास, उकडलेला बटाटा एक बारीक करून, मीठ एक चमचा
कृती:- कढइत तेल टाकून जिरे, हिरवी मिरचीची व कधी पत्त्याची फोडणी घालून
त्यात एक ग्लास ताक उकळून घ्या. त्यात दाण्याचा कूट आणि बटाट चुरून शिजवून घ्या
मीठ टाकून हलवा. उपवासाचा पिठलं तयार.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*