देवधर, वि. ना.

एकापेक्षा अधिक परिचितांचे आकस्मिक मृत्यू एकाच दिवशी घडावेत हा कुयोग अलीकडच्या काळात परवाच्या मंगळवारी दुसऱ्यांदा घडून आला. दीनदयाळ शोध संस्थानचे संस्थापक नानाजी देशमुख आणि रा. स्व. संघाचे भूतपूर्व बौद्धिक विभाग प्रमुख डॉ. श्रीपती शास्त्री गेले तेव्हा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात पहिल्यांदा, आणि ज्येष्ठ गायक कै. सुधीर फडके यांच्या पत्नी ललिता फडके आणि ज्येष्ठ पत्रकार वि. ना. देवधर यांचे निधन झाले तेव्हा दुसऱ्यांदा.

देवधर लोकसत्ता परिवाराला जवळचे होते, कारण ज्येष्ठ सहसंपादक या नात्याने त्यांनी आपल्या वृत्तपत्र कारकीर्दीतली काही वर्षे ‘लोकसत्ता’त व्यतीत केली होती. देवधर तसे मूळचे पुण्याचे, शालेय शिक्षण सुरू असतानाच त्यांचा वृत्तपत्र व्यवसायाशी संबंध आला तो वृत्तपत्राचे गठ्ठे पोचवण्याच्या निमित्ताने. लेखनाची आवड असल्याने आणि श्री. म. माटे यांच्याकडे लेखनिक म्हणून उमेदवारी केली असल्याने लेखणीला आणि भाषेला जे वळण लागले होते, त्याच्याच आधाराने देवधर बातमीदारीत आले. ‘दैनिक भारत’ आणि ‘केसरी’त त्यांनी बातमीदारी सुरू केली आणि त्याच अनुभवावर मुंबईतून ‘महाराष्ट्र टाइम्स’ सुरू होताच देवधर तिथे रुजू झाले.

आर्थिक आणि राजकीय विश्लेषण ही देवधरांच्या बातमीदारीतली खासियत राहिल्याने काही काळ मुंबईत विधिमंडळाचे आणि नंतर दिल्लीत संसदेचे रिपोर्टिग त्यांनी केले. ‘राजधानीतून’ हे त्यांचे दिल्लीच्या बातमीदारीविषयीचे लेखन गाजले. त्याने दिल्लीच्या बातमीदारीचा एक नवा पायंडा पाडला. देवधर राजकीय विश्लेषण जेवढे निष्पक्षपणे आणि मार्मिक करीत, तेवढेच ते पडद्यामागच्या घटनांवर, बातमीमागच्या बातमीवर तिरकस आणि खोचक शैलीत लिहीत. ‘भेळ-शहाळी’ हे त्यांचे सदर त्यामुळेच अनेकांच्या स्मरणात राहिले. आणीबाणी उठताच देवधर ‘महाराष्ट्र टाइम्स’ सोडून पुण्याच्या ‘तरुण भारत’मध्ये संपादक म्हणून रुजू झाले.

अवघ्या पाच वर्षांच्या तिथल्या कारकीर्दीत त्यांनी आपल्या समर्थ लेखणीने जनसामान्यांवर ‘तरुण भारत’चा वेगळाच ठसा उमटवला. देवधर हिंदुत्ववादी होते, पण त्यांचे हिंदुत्व हिंदुत्ववादी विचारधारेबाहेरच्या वाचकालाही मोहित करीत राहिले. देवधर हिंदुत्वाच्या विचारधारेत वाढले, आपल्या विचारांशी, निष्ठांशी आयुष्यभर घट्ट राहिले, त्या विचारधारेतल्या मुखंडांनी त्यांची अवहेलनाही केली. स्वाभाविकपणेच त्यांच्याशी मतभेदही झाले, पण तरीही त्यांनी ध्येयवादावरची अतूट निष्ठा मात्र ढळू दिली नाही. विचारधारेचे, चळवळीचे पुरस्कर्तेपण त्यांनी जपले, पण ते जपताना बातमीचे, लेखणीचे पावित्र्य कुठेही कमी होऊ दिले नाही. सरकारी सवलती उपटणे, बातमीच्या पाटय़ा टाकणे, गोट गाठणे, कार्बन कॉपी जर्नालिझम करणे या वाटांना देवधरांची पत्रकारिता जाणे शक्यच नव्हते.

अभ्यासू वृत्ती जोपासत, व्यासंगाची सवय राखत, बातमीचे पावित्र्य जपत देवधरांनी, पत्रकारिता धर्माचे पालन केले. पत्रकार संघटनांमध्येही देवधरांनी काम केले. देवधरांची पत्रकारिता गतिमान होती, अष्टावधानी होती. निवृत्तीनंतरही देवधर पत्रकारितेतच सक्रिय राहिले आणि अन्य वृत्तपत्रांकरिता स्तंभलेखन, अग्रलेख लेखन करीत राहिले. प्रकृतीने साथ दिली असती तर पत्रकारितेच्या अध्यापनाबरोबरच नव्या पिढीतील पत्रकारही ज्ञानी, कृतिशील आणि बहुआयामी बनावेत यासाठी ते कार्यरत राहिलेले दिसले असते.

यशवंतराव चव्हाणांच्या एका पत्रकार परिषदेत केवळ त्यांना आलेल्या दूरध्वनीवरून देवधरांनी शोधून काढलेली यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री होणार असल्याची बातमी, त्यांच्या निरीक्षण, विश्लेषण क्षमतेचे कौशल्य दाखवणारी ठरली होती. ती बातमी देणारे ते पहिलेच मराठी पत्रकार ठरले होते. पत्रकार परिषदेदरम्यान आलेला तो दूरध्वनी सुरू असताना देवधरांनी टिपलेले चव्हाणांच्या मुद्रेवरचे भाव, चव्हाणांनी दूरध्वनीवरूनच दिलेली मोघम उत्तरे, त्यांची देहबोली, त्यांच्या बोलण्यात आलेला ‘संरक्षण’ हा एकमेव शब्द यावरूनच देवधरांनी बेधडकपणे यशवंतराव संरक्षणमंत्री होऊ घातले असल्याचा अंदाज वर्तवला होता आणि तो अचूक ठरला होता. अशी अचूक निष्कर्षशक्ती असणाऱ्या देवधरांनी नुकतेच ८१ व्या वर्षांत पदार्पण केले होते.

प्रकृती साथ देत नव्हती, पण प्रकृती अशी एकाएकी दगा देईल असेही वाटत नव्हते, अशा क्षणीच त्यांचे जाणे झाले आहे. ते खचितच धक्का देणारे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*